गुलजार,संजय दत्त आणि गुलशन गोवरचे किस्से

gulzar sanjay dutt and gulshan grover kissa.jpg

गुलजार यांचा ‘लिबास’ तयार झाला पण पडद्यावर आला नाही

गुलजार (Gulzar) यांची ओळख करून देण्याची गरज आहे असे वाटत नाही. प्रख्यात लेखक, गीतकार, निर्माता आणि दिग्दर्शक अशी अनेक रूपे त्यांची असून या सर्व रुपांमध्ये त्यांनी चांगलेच यश मिळवले आहे. मात्र याच गुलजार यांचा एक चित्रपट पूर्ण झाला. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला पण दुर्देव असे की हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शितच होऊ शकला नाही आणि प्रेक्षकांना गुलजारच्या या संवेदनशील चित्रपटाचा आनंदच घेता आला नाही.

नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि राज बब्बर अभिनीत ‘लिबास’ 1988 मध्ये तयार झाला. या चित्रपटासाठी पंचम उर्फ आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते. त्यांचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले होेते. एक चित्रपट दिग्दर्शक आणि त्याची पत्नी यांच्यातील संबंधांवर आधारित प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर्स, गाणी प्रदर्शित झाली. चित्रपट रिलीज होणार म्हणून याचे ट्रेलरही तयार करण्यात आले होते. परंतु चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाची डीव्हीडी, व्हीसीडीही उपलब्ध नाही. चित्रपट प्रदर्शित न होण्यामागचे कारण निर्माता आणि गुलजार यांच्यातील वाद असे बॉलिवूडमध्ये सांगितले जाते. चित्रपटाच्या कथेत बदल करण्यात यावा अशी निर्माता विकास मोहन यांची इच्छा होती पण गुलजार कथेत बदल करण्यास तयार नव्हते. चित्रपटाच्या शेवटी शबाना कोणालातरी एकाला स्वीकारते असे दाखवावे असे निर्मात्यांना वाटत होते तर गुलजार यांनी चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांवर सोडला होता. त्यामुळे चित्रपट पूर्ण होऊनही आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र चित्रपट महोत्सवात काही प्रेक्षकांना हा चित्रपट दाखवण्यात आला होता.

जेव्हा संजय दत्त दारु पिऊन श्रीदेवीच्या रुममध्ये शिरला होता

श्रीदेवी म्हणजे केवळ बॉलिवूडमधील काही लोकांच्याच नव्हे तर प्रेक्षकांच्याही मनातील राणी होती. श्रीदेवीचे अवखळ वागणे, तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली होती. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असणारे लाखो जण होते. मात्र श्रीदेवीच्या सुरुवातीच्या काळात संजय दत्तने जे काही केले होते ते सगळ्यांनाच चकित करणारे होते. ही अत्यंत जुनी म्हणजे 1982-83 ची गोष्ट आहे. तेव्हा श्रीदेवी बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याच्या मार्गावर होती. जीतेंद्र नायक असलेल्या आणि श्रीदेवीला नाव मिळवून देणाऱ्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. संजय दत्तला हे समजताच तो श्रीदेवीला भेटण्यासाठी सेटवर गेला. परंतु ती तेथे नव्हती. ती हॉटेलमध्ये गेल्याचे संजय दत्तला सांगण्यात आले. संजय दत्त लगेचच श्रीदेवी राहात असलेल्या हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी तो दारुच्या पूर्ण नशेत होता. आपण काय करतोय हे त्याला कळत नव्हते. तो श्रीदेवीच्या रूमसमोर गेला आणि दरवाजा वाजवू लागला. श्रीदेवीने दरवाजा उघडताच तो सरळ आत शिरला. श्रीदेवीला काहीच कळेना. ती घाबरली आणि तिने लगेचच संजय दत्तला रूमबाहेर काढले. स्वतः संजय दत्तनेच एका मुलाखतीत ही घटना सांगून त्यावेळी मी श्रीदेवीबरोबर कसा वागलो ते मला आजही आठवत नाही असेही म्हटले होते. या घटनेनंतर या दोघांनी महेश भट्ट दिग्दर्शित ‘गुमराह’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

शाळेत असताना घरोघरी जाऊन डिटर्जन्ट पावडर विकत असे गुलशन ग्रोव्हर

बॉलिवूडमध्ये ‘बॅडमॅन’ नावाने गुलशन ग्रोव्हरची ओळख आहे. केवळ हिंदीच नव्हे तर जर्मन, ऑस्ट्रेलियन, पोलिश, कॅनेडियन, ईरानी, मलेशियन, ब्रिटन, नेपाळी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. तसेच भारतातील विविध भाषांमधीलही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हॉलिवूडमध्ये यश मिळवणारा भारतीय कलाकार म्हणूनही त्याची ओळख आहे. आता गुलशन ग्रोव्हर चित्रपटात दिसत नसला तरी त्याच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आयुष्यात प्रचंड यश मिळवलेल्या गुलशन ग्रोव्हरचे लहानपण मात्र अत्यंत गरीबीत गेले होते.

स्वतः गुलशन ग्रोव्हरनेच लहानपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. गुलशनने सांगितले, लहान असताना आमच्या घरची स्थिती काही चांगली नव्हती. त्यामुळे लहान वयातच मी काम करण्यास शिकलो होतो. माझी शाळा दुपारची असायची. पण सकाळपासूनच दप्तर घेऊन बाहेर पडायचो. दप्तरात शाळेची पुस्तके, कपड्यांसोबतच कपडे, भांडी धुण्याची पावडर, फिनाईल इत्यादी घरगुती साफसफाईचे सामान असायचे. शाळेत जाण्यापूर्वी मी ते घरोघरी जाऊन विकायचो. यातून जो पैसा मिळायचा त्यातून माझ्या शाळेचा खर्च सुटत असे. कधी कधी तर आम्हाला दोन वेळचे जेवणही मिळायचे नाही. पण वडिलांनी प्रामाणिकपणाने वागण्याची शिकवण दिलेली असल्याने सर्व सहन करायचो. बॉलिवूडमध्ये संघर्ष करताना या अनुभवाचा उपयोग झाला. त्यामुळे का ळत नसतानाही मी नाऊमेद झालो नाही. काम करीत राहिलो आणि यश मिळवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER