केवळ एका दृश्यात दिसले होते गुलजार, मुकेशसह अनेक कलाकार

Gulzar-Mukesh .jpg

रुपेरी पडद्यावर दिसण्याची जवळ जवळ प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे जेथे संधी मिळेल तेथे पडद्यावर येण्याची हौस अनेक जण भागवताना दिसतात. तर काही अभिनेते केवळ एकाच दृश्यात अशी काही करामात दाखवतात की त्यामुळे त्यांना पुढे अनेक मोठे चित्रपट मिळतात. कधी कधी काही जण केवळ मैत्रीखातर काही सेकंदाची भूमिका चित्रपटात साकारतानाही दिसतात. यात अगदी प्रख्यात गायक मुकेशपासून (Mukesh) गुलजार (Gulzar) आणि अक्षयकुमारपर्यंत अनेकांचा समावेश आहे.

यादीत गुलजार यांचे नाव पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. गुलजार यांनी चित्रपटात काम केल्याचे कोणालाही आठवत नसेल. गीतकार गुलजार यांनी एक नव्हे तर दोन चित्रपटांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून अक्षरशः काही मिनिटांच्या भूमिका साकारल्या आहेत. गुलजार यांनी सर्वप्रथम 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजीव कुमार, शर्मिला टागोर अभिनीत ‘गृह प्रवेश’ चित्रपटातील एका गाण्यात छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर ते कॅमेऱ्यापासून लांबच होते. पण 2009 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि अजय देवगन अभिनीत ‘रेनकोट’ चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत एक कविता म्हटली होती. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये गुलजार यांचीच गीते होती. याशिवाय त्यांनीच लिहिलेल्या जालियनवाला बाग चित्रपटातही त्यांनी अभिनयाची हौस भागवून घेतली होती.

गीतकार गुलजार यांच्याप्रमाणेच गायक मुकेशनेही पाहुण्या कलाकाराची भूमिका केवळ मित्राच्या सांगण्यावरून साकारली होती. 1953 मध्ये राज कपूर अभिनीत ‘आह’ चित्रपटात मुकेशने एका टांगा चालकाची भूमिका साकारली होती. नरगिसचे दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न झाल्यावर राज कपूर एक टांगा घेऊन तेथून निघून जातो. तो ज्या टांग्यात बसलेला असतो त्याच्या चालकाच्या रुपात मुकेश होता. विशेष म्हणजे ‘छोटी सी है ये जिंदगानी’ गाणे राज कपूरवर चित्रित केले जाणार होते पण ते मुकेशवरच चित्रित करण्यात आले होते. अर्थात हे गाणे मुकेशने स्वतःच गायले होते.

प्रख्यात ऊर्दू शायर आणि शबाना आझमीचे पिता कैफी आझमी यांनीही एका चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. 1958 मध्ये बलराज साहनी अभिनीत ‘सोने की चिडिया’ चित्रपटात कैफी आझमी यांनी दर्शन दिले होते. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक विजय आनंद यांनीही भाऊ देव आनदच्या 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे घर के सामने’ चित्रपटात दर्शन दिले होते. या चित्रपटातील एक अत्यंत लोकप्रिय गीत म्हणजे ‘दिल का भंवर करे पुकार’. देव आनंद आणि नूतनवर हे गाणे कुतुबमिनारमध्ये चित्रित करण्यात आले होेते. यावेळी विजय आनंद यांनी पायऱ्यांवरून उतरणाऱ्या व्यक्तीच्या रुपात काही सेकंद दर्शन दिले होते.

काही अभिनेत्यांनी काही सेकंदांचे दृश्य करून नंतर चांगलेच यश मिळवले होते. यात नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. विधु विनोद चोप्राच्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये एका चोराच्या भूमिकेत नवाजुद्दीनने काही सेकंदाचे काम केले होते. त्यानंतर आलेल्या न्यूयॉर्क चित्रपटानंतर नवाजुद्दीन यशस्वी अभिनेता झाला. याचप्रकारे दीपक डोबरियालनेही ‘गुलाल’ चित्रपटात एक मिनिटाचीही नसलेल्या भूमिकेत स्वतःचे अस्वित्व जाणवून दिले होते. एका पानवाल्याशी बोलतानाचे दृश्य होते. यानंतर त्याने ‘तनु वेड्स मनु” मध्ये काम केले. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि दीपक आज यशस्वी अभिनेता झाला आहे.

काही प्रचंड यशस्वी कलाकारांनीही केवळ मैत्रीखातर अनेक चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकारांच्या भूमिका केल्या आहेत. ही यादी बरीच मोठी आहे. अक्षयकुमारने ‘दिल तो पागल है’ चित्रपटात काही सेकंदांचीच भूमिका केली. इंटरव्हलनंतर फोनवर बोलत असलेला अक्षय माधुरीसोबत दिसला होता. त्याला ओळखेपर्यंत दृश्य संपलेही होते.

संजीव कुमार जया भादुरीच्या अभिनयाने नटलेल्या ‘खामोशी’ चित्रपटात प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार यांनी काही सेकंदाची भूमिका केली होती. मुके-बहिरे असलेले संजीव आणि जया असेच कोणालाही फोन करीत असतात. त्यांना बोलायला-ऐकायला येत नसते पण गंमत म्हणून करीत असतात. दोन फोननंतर ते तिसऱ्या नंबरवर ज्याला फोन करतात तो दिलीप कुमार यांचा असतो.

जया बच्चन अभिनीत ‘गुड्डी’ चित्रपटात धर्मेंद्रने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. परंतु या चित्रपटात प्राणनेही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेली आहे. चित्रपटाच्या सेटवर प्राण धर्मेंद्रला भेटायला येतो असे दृश्य होते. या दृश्यात प्राण आपले घड्याळ धर्मेंद्रला देतो असे दाखवले होते. तेव्हा जया बच्चन धर्मेंद्रला प्राणचे घड्याळ घेऊ नको तो वाईट माणूस आहे असे सांगते. कारण प्राण तेव्हा चित्रपटातील प्रमुख खलनायक म्हणून भूमिका साकारीत असे.

शाहरुख खान, जूही चावला, सलमान खान, माधुरी दीक्षित, आमिर खान, अमिताभ बच्चन यांनीही अनेक चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER