
गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंद अनेक गृहिणी घरीदेखील तयार करीत असतात. आयुर्वेद औषधी दुकानांमध्ये हमखास मिळणारा गुलकंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. पित्त वाढल्यास चमचाभर गुलकंद लगेच आराम देतो. दुधात, विड्याच्या पानात, आइस्क्रीममध्ये गुलकंद चव वाढविणारा असतो.
गुलकंद हे पित्तशमन करणारे तर आहेच; शिवाय उष्णतेने शरीराची आग होत असेल, शिरःशूल होत असेल तर गुलकंद आराम देणारे औषध आहे.
एखादेवेळी खूप तिखट मसालेदार जेवण झाले की पोटात, छातीत जळजळ होते. अशा वेळी गुलकंद एक-दोन चमच खाल्ल्यास लगेच आराम पडतो.
गुलकंद सेवनाने स्त्रियांचे उष्णतेचे विकार कमी होतात. गर्भाशयाला बल प्राप्त होते. अत्यार्तव (मासिक स्राव जास्त होणे) असेल तर गुलकंद घ्यावा.
हातापायाची आग होणे, डोळ्यांमध्ये जळजळ, डोळ्यातून गरम पाणी येणे, उष्णतेमुळे चेहरा काळवंडणे तसेच घामोळ्या येणे या सर्वच विकारांवर गुलकंद रोज घेतल्यास आराम पडतो. डोकं शांत राहणे, थकवा दूर करण्याकरिता गुलकंद घ्यावा. लघवीमध्ये दाह, लालपिवळी मूत्रप्रवृत्ती होणे, उन्हाळी लागणे या सर्वच मूत्रविकारावर गुलकंद प्रभावी उपाय आहे.
उन्हाळ्यात वारंवार तहान लागते व पाणी पिल्याने समाधान होत नाही. अशा वेळी गुलकंद दुधात वा पाण्यात टाकून घेतल्याने तृष्णा शमन होते. उन्हाळ्यात बरेच वेळा नाकातून रक्त निघण्याचा त्रास अनेकांना होतो. अशा वेळी घरून निघतांना एक चमच गुलकंद घेतल्यास हा त्रास होत नाही.
आजकाल साधा गुलकंद आणि प्रवाळमिश्रित गुलकंद उपलब्ध आहे. प्रवाळमिश्रित गुलकंद हा जास्त प्रभावी, गुणकारी आहे. ज्यांना पित्तविकार आहेत त्यांना वैद्याच्या सल्ल्याने घ्यायला हरकत नाही. साधा गुलकंददेखील उष्णता कमी करण्याकरिता उपयोगी ठरतोच. यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी काळजीपूर्वक वापर करावा. असा औषधी गुणयुक्त गुलकंद घरी नक्कीच असावा.
ह्या बातम्या पण वाचा :
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला