गुळवेल : ज्वरनाशी अमृतलता

gulvel

कोरोनामुळे (Corona) अनेक औषधी वनस्पतींची नावे बऱ्याच जणांना माहिती झाली आहे. त्यापैकी एक आहे गुळवेल. गुळवेल ही वेल निंब, आंबा वृक्षावर किंवा कुंपणावर चढलेली असते. अगदी भराभर वाढणारी वेल हृदयाकार जाळीदार शिरा असलेल्या पानांची असते. हिची  पाने आणि कांड औषधी प्रयोगार्थ वापरतात. हे  कांड मधून चिरल्यास चक्राकार आकृती दिसते. म्हणूनच गुडूचीला चक्र लक्षणिका म्हणतात. मधुपर्णी, अमृता, छिन्नरुहा, वत्सादनी, ज्वरारि (ज्वराची शत्रू) रसायनी अशी अनेक नावे गुळवेलीकरिता आली आहेत. गुळवेल ही कडू, तिखट, कषाय रसाची असते.

गुळवेलीपासून, स्वरससत्त्वकल्क काढा, वटी, सौषध, गुग्गुळकल्प चूर्ण, लेप, तेल घृत अशा सर्व औषधी निर्माण केल्या जातात. पंचकर्म चिकित्सेत याचा विविध रूपात वापर केला जातो. गुळवेलीच्या गुणांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात या वनस्पतीचा वापर आयुर्वेद शास्त्रात केला आहे. गुळवेलीचा वापर अगदी ज्वरापासून तर वातव्याधी, कॅन्सरपर्यंत आणि आता कोरोनामध्येसुद्धा करण्यात येतोय; कारण वातपित्तकफ या तिन्ही दोषांचे शमन करणारी ही वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार कोणतीही व्याधी दोषांच्या असंतुलनामुळे निर्माण होते आणि गुळवेल तिन्ही दोषांवर कार्य करणारी आहे. प्रमेह असो वा आमवात, कावीळ असो वा स्थौल्य, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुडूची उपयोगी पडते. विविध औषधी संयोगाने किंवा फक्त गुडूचीचा वापर व्याधींमध्ये  केला जातो.

  • गुळवेलीच्या पानांची भाजीदेखील करतात.
  • वातव्याधीमध्ये  याचा लेप लावणे. कुष्ठ त्वचाविकारात गुळवेलसिद्ध तेलाचा उपयोग फायदेशीर ठरतो.
  • ज्वर, जुनाट ताप, विषमज्वर या अवस्थेत गुळवेल अतिशय उपयोगी आहे.
  • अमृतारिष्ट अमृतादि क्वाथ, संशमनी वटी, गुडूची घनवटी हे सर्व गुळवेल मुख्य घटक असणारे कल्पयुक्तीने लक्षणे बघून तापाच्या विविध अवस्थेत वापरल्या जातात.
  • शक्यतो ओली ताजी गुळवेल वापरली तर जास्त गुणकारी असते.
  • कडूलिंबाच्या झाडावर वाढलेली गुळवेल अधिक गुणकारी असते.
  • गुळवेलसत्त्व हे गुळवेलीच्या कांडाचा उपयोग करून काढले  जाते. हे गुळवेलसत्त्व दाह, पित्त कमी करणारे असते. अनेक पित्तविकारांत हे गुळवेलसत्त्व उपयोगी ठरते.

गुळवेल हे उत्तम रसायन ( सर्व सप्तधातूंना बल देणारे) वयस्थापन ( aging process लांबवणारे ) आहे. अमृताप्रमाणे काम करणारी म्हणूनच गुळवेलीला ‘अमृता’ हे नाव आयुर्वेदात आले आहे. अशी ही ज्वरनाशी अमृतलता प्रत्येकाने आपल्या घरी नक्कीच लावावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER