बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच, ही मानसिकता पूर्वीपासूनच – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

अहमदनगर :- कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू करत आहे. परिस्थिती बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. परंतु काहीच नसलं तर श्रेय घ्यायचं असतं. बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून आहे, असा खरमरीत टोला शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपला लगावला.

गुलाबराव पाटील बुधवारी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डी येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दिवाळी पाडव्यापासून (सोमवार, १६ नोव्हेंबर) राज्यभरातील सर्व मंदिरं भाविकांसाठी उघडी करण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने राज्यभर ढोल-ताशा, घंटानाद करत या निर्णयाचं स्वागत केलं. त्याचबरोबर मंदिर उघडण्यासाठी भाजपने आक्रमक पाऊल उचलल्यानेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, अशा आविर्भावात भाजप नेते बोलत होते. मंदिर उघडल्यानंतर सुरु असलेल्या या श्रेयवादावरून गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, खडसेंनी महाविकास आघाडी वाढवावी, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी राष्ट्रवादी वाढवावी. मी शिवसेना वाढवणार. मात्र आपण दोघे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक आहोत हे विसरता कामा नये, असा चिमटा त्यांनी काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER