शरद पवार ‘ठाकरे’ सरकारचे पालक; विरोधकांनी पवारांची चिंता करू नये – संजय राऊत

Sanjay Raut-Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त करणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. त्यात घटनेची पायमल्ली झाली. कायद्याचे उल्लंघन झाले हे आजही आम्ही सांगत असतो. त्याचप्रमाणे राज्यातही राज्यपाल नियुक्तीवरून राजकारण होतांना दिसत आहे. कॅबिनेटने राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करणे आणि राज्यपालांनी त्या सदस्यांची नियुक्ती करणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. मात्र रिक्त झालेल्या जागेवरून अदयाप कुठलीही हालचाल झालेली नाही. यावरूनच राज्यात आणीबाणी लादली जात आहे का? असा प्रश्न मी सामनातून उपस्थित केला, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिले.

आतापर्यंत राज्यपाल नियुक्त आमदारांची नेमणूक का झाली नाही? यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ऑक्टोबरपर्यंत महाविकास आघाडी सरकारला पडायचं आणि त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी आपल्या पक्षाचे सदस्य नेमावे. मात्र ते सध्यातरी शक्य नाही. ऑपरेशन लोटस चार वर्षेतरी शक्य नाही. हे ऑपरेशन होमिओपॅथी अथवा आयुर्वेद पद्धतीने होणार का हे माहिती नाही. मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतो. ते सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी उत्तम काम करावे. पुढच्या निवडणुकीत त्यांनी हवं ते ऑपरेशन करावे असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवार नाराज आहेत, पारनेरमध्ये शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. असे काहीही नाही. ते स्थानिक राजकारण आहे. यात पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी फोडाफाडी केली असे चित्र दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यात सहभागी नाही. त्यामुळे याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राहिली शरद पवारांच्या नाराजीच्या बातम्यांची तर, मी हमखास सांगतो पवार नाराज नाही. ते ठाकरे सरकारचे पालक आणि मार्गदर्शक आहेत. आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याने चूक केली तर त्यांना आमचे कान पकडण्याचे अधिकार आहे. त्यांनी वडीलकीच्या नात्याने मुख्यमंत्र्यांना काही सूचना केली असेल तर ती नाराजी नाही. त्यांना पटले नाही तर ते हमखास सांगून मोकळे होतात. त्यांना कामांचा प्रदीर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचे नाव आहे. त्यांना पटले नाही तर तसे सांगतात. मात्र दबाव आणत नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.