कांदळवनामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल- पालकमंत्री विनोद तावडे

गोराईच्या कांदळवन उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन

mhnews2 8

मुंबई : कांदळवन म्हटले की समुद्रातील किंवा खाडीतील छोटीशी झाडी वाटते. कांदळवन पर्यटनामुळे कांदळवन जपले जाण्याबरोबरच समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षिततेची भावना कांदळवनाच्या माध्यमातून निर्माण होईल असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

श्री. तावडे यांच्या संकल्पनेतून बोरीवली पश्चिम गोराई येथील कांदळवन उद्यानाची (मॅग्रोव्ह पार्क) निर्मिती करण्यात येत आहे. भारतातील दुसऱ्या व महाराष्ट्रातील या पहिल्या अभिनव प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अटल स्मृती उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.

श्री. तावडे म्हणाले, भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे आणि या स्मृतीदिनाच्या निमित्ताने प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. मुंबईसारख्या शहराला असणारा त्सुनामीचा धोका कमी होण्यास या कांदळवनाची मदत होणार आहे. खाडी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते कचरा, घाण टाकण्याचे ठिकाण. केरळ राज्यात याच खाडीला बॅकवॉटर म्हणतात आणि केरळने बॅकवॉटर पर्यटन अत्यंत उत्तमपणे सक्षम केले आहे. याच बॅकवॉटरच्या जोरावर या राज्याचे पर्यटन वाढले. याच धर्तीवर महाराष्ट्रात काही करता येईल का असा विचार होता, गोराई परिसराची पाहणी करताना गोराई खाडीमधील कांदळवन दिसली आणि मग या कांदळवनाचे संवर्धन कसे करता येईल, याचा विचार सुरु झाला. त्यानंतर जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून या कांदळवनाचा विकास करण्याची योजना आखली व कांदळवन उद्यानाचा हा प्रकल्प हाती घेतला.

mhnews2 9

पर्यावरणाच्या दृष्टीने आदर्श प्रकल्प ठरेल – नितीन गडकरी

गोराई कांदळवन प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करेल, या अभिनव प्रकल्पाच्या माध्यमातून कांदळवनांचे संवर्धन तर होईलच, पण हा प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने एक आदर्श ठरेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

श्री. गडकरी यावेळी म्हणाले, अटलजी यांनी मला कायम राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद याबाबत सांगितले आणि आपण त्याच विचारावर चालत आहोत. सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंट यातून शहरांचा विकास करता येऊ शकतो. एवढच नाही तर सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून योजनात्मक काम केल्यास याचे परिवर्तन वेल्थ मॅनेजमेंट मध्ये होऊ शकतो. मुंबईसह महाराष्ट्राला जल प्रदूषण व वायू प्रदूषण याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास व पर्यावरण पूरक प्रकल्प व योजना हाती घेतल्यास मुंबई आगामी काळात जल व वायू प्रदूषणापासून मुक्त होऊ शकते. आज भूमिपूजन होत असलेला कांदळवन प्रकल्प हा एक आदर्श प्रकल्प आहे. श्री. तावडे यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प पर्यावरणपूरक तसेच कांदळवनाचे संवर्धन व कांदळवनाविषयी जागृती करणारा ठरणार आहे असा विश्वासही श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज भारत देश ‘सुपर इकॉनॉमी’ च्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे सांगतानाच गडकरी म्हणाले, मुंबईचा समुद्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबईच्या समुद्राच्या प्रदूषणातून नक्कीच मुक्तता मिळू शकते आणि मुंबईच्या समुद्रही नजीकच्या काळात मॉरिशिअस मधील समुद्रांसारखा प्रदूषणमुक्त व स्वच्छ न निर्मळ होईल असा विश्वासही श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, खासदार गोपाळ शेट्टी,आमदार अतुल भातखळकर, आमदार भाई गिरकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.