या खेळाडूंसाठी वाढते वय ही आहे फक्त एक संख्या

Sports Players

व्यावसायीक खेळांची दुनिया अतिशय स्पर्धात्मक असते आणि खेळाडूंची कारकिर्द फार काळ चालणारी नसते असे म्हणतात. स्पर्धात्मक वातावरणात खेळांमध्ये दीर्घकाळ सातत्य राखणे फार अवघड असते हे सर्वच जण मान्य करतील, असे असले तरी व्हिनस विल्यम्स (Venus Williams)., दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) , नौमान अली (Nauman Ali) आणि फवाद आलम (Fawad Alam) हे हा समज खोटा असल्याचे सिध्द करत आहेत. या चौघांचीही कारकिर्द आणि त्यांनी अलीकडेच मिळवलेले यश पाहता वय ही तर फक्त एक संख्या आहे (Age is just a number) असे वाटू लागलेय.

दिनेश कार्तिकचेच उदाहरण घ्या. त्याच्या नेतृत्वात तामिळनाडूच्या संघाने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. तब्बल 14 वर्षानंतर तामिळनाडूने हे विजेतेपद पटकावले आणि योगायोगाचा भाग म्हणजे 14 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या विजेत्या संघाचाही कर्णधार दिनेश कार्तिकच होता आणि आतासुध्दा तोच विजेता कर्णधार आहे. एप्रिल 2007 ते जानेवारी 2021 हा 14 वर्षांचा पल्ला छोटा नक्कीच नाही पण या दीर्घ काळातही दिनेश कार्तिक आपले स्थान टिकवून आहे ते केवळ सातत्य राखल्यानेच. यावेळी त्याने अंतिम सामन्यात 17 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले.

अमेरिकेची माजी नंबर वन टेनिसपटू व्हिनस विल्यम्स हीसुध्दा अशा दीर्घकाळ सातत्याचे उत्तम उदाहरण आहे. तिने गेल्या तब्बल 28 वर्षात दरवर्षी डब्ल्यूटीए टूरच्या स्पर्धात किमान एकतरी सामना जिंकला आहे. यात सामने किती जिंकले यापेक्षा अतिशय स्पर्धा असणाऱ्या व्यावसायिक टेनिसमध्ये तब्बल 28 वर्षे खेळत राहणे हेच विशेष आहे. इतर कोणत्याही महिला टेनिसपटूला हे जमलेले नाही यावरुन ही कामगिरी किती असाधारण आहे हे लक्षात यावे.

पाकिस्तानी फलंदाज फवाद आलम हासुध्दा अशाच प्रदीर्घ कारकिर्दीसाठी चर्चेत आहे. त्याने कसोटी पदार्पणातच शतकं झळकावले होते पण त्यानंतरही तो तब्बल 11 वर्षे संघाबाहेर होता आणि 11 वर्षानंतर संघात पुनरागमन केल्यावर त्याने 5 सामन्यात आणखी दोन शतकं झळकावली आहेत. या मधल्या 11 वर्षात तो सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत राहिला, स्वतःचा फिटनेसही राखला म्हणून तब्बल 11 वर्षानंतर तो पुन्हा पाकिस्तानी संघात स्थान मिळवू शकला.

पाकिस्तानचाच गोलंदाज नौमान अली याने 34 वर्षांच्या वयात अलीकडेच कसोटी पदार्पण साजरे केले आणि या वयातही कराची कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ दुसऱ्या डावात एकट्याने गारद करून age is just a number हे सिध्द केले. 34 वर्ष 114 दिवस वयात त्याने ही विक्रमी कामगिरी केली.

याप्रकारे गेल्या काही दिवसात हे असे काही खेळाडू आहेत ज्यांनी तुमच्या मनगटात जोर असेल तर वयाने काही फरक पडत नाही हेच सिध्द केले आहे आणि युवा खेळाडूंसाठी ते प्रेरणास्रोत ठरत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER