बाळासाहेब तुम्हाला सलाम आणि वंदन !

Balasaheb Thackeray

Shailendra Paranjapeरोजचे रोजचे पेपर चाळले. बातम्या डोळ्यांखालून घातल्या. सीरमच्या आगीच्या बातमीचा फॉलोअप, धनंजय मुंडे प्रकरणात तरुणीने फिर्याद मागे घेतली. बातम्या वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा एक गोष्ट जाणवत राहिली की, तीन दशके पुणे, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरात बातमीदारी केल्यानंतर आणि ‘सामना’ वृत्तपत्राच्या स्थापनेआधीपासून स्वर्गीय बाळासाहेबांना भेटण्याची संधी मिळालेली असल्याने त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्याविषयी न लिहिणं हे कृतघ्नपणाचंच ठरेल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा पहिला योग दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करताना १९८८ मध्ये आला. त्याआधी बाळासाहेबांबद्दल वाचलेलं, ऐकलेलं खूप होतं. पण पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरासमोरच्या व्हाईट हाऊस या इमारतीत असलेल्या दैनिक संध्या आणि रोहिणी मासिक या स्वर्गीय वसंत काणे यांच्या कार्यालयात बाळासाहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांनी पत्रकारांविषयीची तक्रार मांडली होती. तुम्ही लोक माझं म्हणणं नीटपणे मांडत नाही आणि मला नसत्या वादांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आता मीच स्वतःचं म्हणजे शिवसेनेचं वृत्तपत्र काढणार आहे. बाळासाहेबांसमोर काहीसे भिजल्या मांजरासारखेच बसलेल्या पत्रकारांचे चेहरे एकदम खुलले. बातमी मोठीच होती की शिवसेना मुखपत्र काढणार… लगेच जिज्ञासूंनी बाळासाहेबांना प्रश्नांच्या फैरी सुरू केल्या. पेपरचं नाव काय असेल, संपादक कोण असेल.

बाळासाहेब पटकन म्हणाले, अरे तुम्ही लोक माझं नीट छापत नाही म्हणून तर पेपर काढणारे. मग दुसऱ्या कोणाला संपादक करून चालेल का…पण आज फक्त पेपर काढतोय इतकंच छापा आणि आता पेनं बंद करा. चहा पिऊ, गप्पा मारू. याचा अर्थ आता यापुढे जे बोलतोय ते सारे ऑफ द रेकॉर्ड… जुन्या पिढीतल्या पत्रकारांना या ऑफ द रेकॉर्डची सवय होती. त्यातून अनेक नेत्यांबद्दलचे, घटनांबद्दलचे प्रचलित किस्से आणि त्यामागच्या खऱ्या कहाण्या हे समजायचं. थेट त्या त्या व्यक्तीकडून. ते आता होत नाही. टीव्ही वाहिन्या आणि मोबाईल फोन्स आल्यानंतर अगदी शरद पवारांपासून ते सर्वच नेत्यांचं असं मनमोकळं ऑफ द रेकॉर्ड बोलणं बंद झालंय. त्यामुळेच चहा पिता पिता बाळासाहेबांनी सांगितलेले किस्से, काही व्यक्तींवर केलेल्या कॉमेंट्स हे सारं ऐकणं म्हणजे अविस्मरणीय अनुभवच होते.

पुढे पुण्याच्या ‘सामना’ आवृत्तीचे तत्कालीन संपादक हरीश कैंची यांच्यामुळे बाळासाहेब पुण्यात आले की, काही मोजक्या पत्रकारांना खास गप्पा मारायला बोलवायचे. त्यातून त्यांचं जे दर्शन घडलं ते राजकीय समज अनेक पटींनी वाढवणारं ठरलं. बाळासाहेबांबद्दल ते शरद पवारांसारखे चोवीस तास कार्यरत असणारे राजकारणी नव्हते, असा एक समज आहे; पण बाळासाहेब मोठे राजकारणी होते आणि त्यांना त्यांची कॉन्स्टिट्यूअन्सी पक्की माहीत होती, हे त्यांच्या गप्पांमधून प्रत्ययाला यायचं. पुढे बाळासाहेब खूप आजारी होते आणि त्यांचं निधन झालं त्यावेळी पुण्यातले जुने सेना नेते रमेश बोडके यांनी बाळासाहेबांचे काही किस्से सांगितले होते. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार हरिश्चंद्र लचके यांच्याकडे बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे सपत्नीक एका मोटारीतून येत असत.

पावसाळ्याच्या दिवसांत लचके यांच्या जोगेश्वरीपासच्या घरात वाड्याच्या आत एक चौक होता आणि आत गेल्या गेल्या चार पायऱ्या उतरून अंगण ओलांडून पुन्हा चार पायऱ्या चढायला लागायच्या. तेव्हा गाडीचा हॉर्न वाजवल्यावर लचके धावत आले आणि म्हणाले, थांबा छत्री घेऊन येतो. तोवर बाळासाहेब वाड्याच्या चौकात साठलेलं पाणी पाहून म्हणाले, छत्री नको होडी घेऊन ये. ग. वा. बेहेरे यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ संपादकाला नवी कोरी पांढरी अँबेसेडर गाडी चालकासहित देणारे आणि त्याची वाच्यता कधीच न करणारे बाळासाहेब, रिक्षावाल्या शिवसैनिकाच्या नव्या रिक्षातून उद्योगपतीकडे जाताना आणि परत येताना उद्योगपतीची मोटार नाकारून शिवसैनिकाच्या रिक्षातून जायचं पसंत करणारे बाळासाहेब, मिस्कील पण वेळप्रसंगी अतिकठोर होणारे बाळासाहेब, सभेतले हजारो मनांना क्षणात वश करणारे बाळासाहेब… असा नेता होणे नाही. आम्ही भाग्यवान, आम्हाला पत्रकारितेची सुरुवात करताना बाळासाहेब बघायला मिळाले. असे नेते आता होणार नाहीत. बाळासाहेब, पत्रकार आणि माणूस म्हणून श्रीमंत केल्याबद्दल तुम्हाला सलाम आणि वंदन !

शैलेंद्र परांजपे

Discalimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER