शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे उत्तम संधी, फडणवीसांची टोलेबाजी

CM Uddhav Thackeray-Fadnavis.jpg

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सोलापुरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळालेला नाही. असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला लक्ष्य केले. यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी केली होती. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तशी मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वत:च केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची आणि शेतकऱ्यांना सावरण्याची नामी संधी चालून आली आहे. त्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते मंगळवारी उस्मानाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची परिस्थिती विषद केली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एरवीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापणीला आलेली पिके आणि कापून ठेवलेली पिके दोन्ही पाण्यात भिजली. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांमध्ये गुरांना देण्यासाठी चाराही उरलेला नाही, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तसेच पिकांच्या नुकसानीबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरवडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना माती आणून जमिनीची मशागत करण्यासाठी एकराला साधारण 50 हजाराचा खर्च येतो. त्यामुळे सरकारने आता या खरवडून गेलेल्या जमिनी पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. त्यासाठी विशेष योजना आखावी लागेल. याशिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत. शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पुरात वाहून गेली. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे.

जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तेच इतकं राजकीय बोलत आहेत. हे योग्य नाही. मला राजकारणात रस नाही. तुम्ही राजकीय बोललात तर मी राजकीय बोलेन. संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल अशा वक्तव्याची अपेक्षा आपण राज्य सरकारकडून करत आहोत, असं यावेळी फडणवीसांनी म्हटलं. शरद पवारांना सगळं माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. केंद्रातून मदत कशी येते हे शरद पवार यांना चांगलं माहिती आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत ते मदत करतील. युपीएपेक्षा जास्त मदत सरकार करेल, असंही ते म्हणाले आहेत.

या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करत असून चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या इतका जाणकार कोणीच नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मी याआधी कधीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली नाही. दौरा करा, करु नका पण भरघोस मदत करा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

पिकांचं नुकसान तर झालंच आहे पण जमीनही खरडून गेली आहे. मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला एकरामागे ५० हजारांचा खर्च येतो. अशा परिस्थितीत माती वाहून जाते तेव्हा पीक घेणं अशक्यप्राय होतं. खरडून गेलेल्या जमिनीवर पुन्हा माती वाहून आणण्यासाठी योजना करण्याची गरज आहे. आम्ही तशी योजना आणली होती. गाळ शेतकऱ्यांच्या विहिरीत गेला असून तो उपसण्यासाठी योजना तयार करावी लागेल. फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांना सहा महिन्यातच वीमा संपला असं सांगितलं जात आहे. सरकराने दबाब आणून मदत करण्याची गरज, असल्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER