महात्मा गांधीच्या प्रेरणेतून अमेरिकेत क्रांती करणारा महामानव !

Mahatma Gandhi

विमान उडवणाऱ्या पायलटला कळावं की विमानात एक क्रांतीकारी माणूस सामान्य यात्रेकरू प्रमाणं प्रवास करतोय. आणि हे कळाल्यावर तो कॉकपीटमधून बाहेर येऊन त्या क्रांतीकाऱ्याची स्वाक्षरी घेतोय. यावर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय. असं एकदा नाही अनेकदा झालंय. त्या क्रांतीकाऱ्याचं नावं मार्टीन ल्यूथर किंग ज्यूनिअर. त्यांचं भारतावर आणि भारताच त्यांच्यावर भरपूर प्रेम होतं. इतकं की त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला भारतीय मिडिया कव्हर करायची. इतकी की भारतातल्या गावाकुसापर्यंत त्यांच नाव पोहचलं होतं. गांधी कधी अमेरिकेत गेले नव्हते. पण अमेरिकेच्या जनतेला किंग ज्यूनिअरमध्येच गांधींची झलक दिसायची.

अमेरिकेच्या अलबामा राज्यात मांटगोमरी शहरातील बसेसमध्ये कृष्णवर्णीय आणि गोऱ्या लोकांना बसण्यासाठी  वेगवेगळ्या सीट्स होत्या. रोजा पार्क नावाच्या एका कृष्णवर्णीय महिलेने गोऱ्या लोकांसाठी आरक्षित ठेवलेली सिट सोडायला नकार दिला. तिला अटक झाली. ठिणगी पडली नव्या स्वातंत्र लढ्याची. जागतिक शांतता आणि स्वातंत्र्याचं नेतृत्व करु पाहणाऱ्या अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांच्या गुलामीच्या अंताच्या लढाईला सुरुवात झाली. आंदोलन उभं राहिलं या आंदोलनात नायकाच्या रुपात समोर आला मार्टीन ल्यूथर किंग. गांधीच्या मार्गाने जाऊन अहिंसेच्या तत्वावर लढा उभारला . तो स्वतःला गांधींचा शिष्य मानायचा.

खरंतर महात्मा गांधीच्या अहिंसावादाचा जगभर प्रसार होण्यामध्यटे मार्टिन ल्युथर किंग यांचा मोठा वाटा होता.

वर्णभेदाविरूद्ध मोठा लढा जगभर उभारला जात असताना त्याला हिंसक वळण लागण्याचीही भिती होती. आगामी काळात तसे लढेही उभारले गेले. यात ब्लॅक पँथर चळवळीचा मोठा वाटा होता. अमेरिकन अफ्रिकन लोकांना लढण्याचं बळ ब्लॅक पँथर चळवळीतून मिळालं पण त्यांना गुन्हेगार म्हणून रंगवण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला मार्टिन ल्युथर किंग यांचा लढा अहिंसेच्या तत्वावर उभारलेला होता. त्यामुळं या लढ्याला जगभरातून समर्थन मिळालं. व जगभरातील वर्णभेदाच्या लढाईला एक तात्विक आधिष्ठान प्राप्त झालं.

मार्टिन ल्युथर किंग यांचं व्यक्तीमत्व अफाट होतं. जगभरातील तत्वज्ञानाचा अभ्यास केलला हा धर्मगुरू करूणेचा पुरस्करता होता. द्वेषाला प्रेमानं जिंकता येतं, या तत्वज्ञानावर त्यांची निष्ठा होती. त्यामुळं ते फक्त एका वर्णभेदाविरूद्ध लढा देणारे केवळ नेते राहिले नाहीत, तर ते एक मानवतावादी विभूती म्हणून जगमान्य ठरले.

त्यांचे वडील धर्मोपदेशक होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी हा पेशा निवडला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मोर हाऊस महाविद्यालयातून १९४८ मध्ये ते पदवीधर झाले. त्यानंतर तीन वर्षांनी क्रोझर थिऑलॉजिकल सेमिनरीची त्यांनी पदवी घेतली.

बॉस्टन विद्यापीठाने १९५५ मध्ये त्यांना पीएच्. डी. पदवी दिली. बॉस्टन येथे अध्ययन करत असताना कोरेटा स्कॉट या युवतीशी त्यांचा परिचय झाला. आणि पुढे विवाह बंधनात अडकले.  क्रोझर येथे असताना म. गांधींच्या जीवन व तत्त्वज्ञानाचा किंग यांचेवर विलक्षण प्रभाव पडला. तो प्रभाव इतका होता की, त्यांना जगभरात गांधींचा शिष्य म्हणून ओळखलं जावू लागलं.

२८ ऑगस्ट १९६३ रोजी त्याने आयोजित केलेल्या वॉशिंग्टनच्या मोर्च्यात २,५०,००० लोकांनी भाग घेतला होता. त्यावेळी केलेल्या भाषणात त्याने कृष्णवर्णीयांना समानतेने वागविण्याबद्दल आवाहन केले. अमेरिकेच्या सामाजिक दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या महान कामगिरीबद्दल, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी, १९६४ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

केवळ आंदोलन आणि मोर्चे काढून वर्णभेदासारखा गंभीर प्रश्न निकाली निघणार नाही. त्यासाठी विचार पेरायला हवेत याची कल्पना त्यांना होती. दीर्घकाळ चालणाऱ्या परिवर्तनवादी लढ्याची त्यांना कल्पना होती. त्यांनी कारागृहात तसेच इतर उद्योगांतून वेळ काढून अनेक पुस्तके लिहिली.

त्यांपैकी स्ट्राइड टोअर्ड फ्रीडम (१९५८), स्ट्रेंग्थ टू लव्ह (१९६३), व्हाय वुई कांट वेट (१९६४), व्हेअर डू वुई गो फ्रॉम हीअर (१९६७), द ट्रंपेट ऑफ कॉन्शन्स (१९६८), आय हॅव्ह ए ड्रीम (१९६८) वगैरे महत्त्वाची होत. त्यांतून त्याची विचारसरणी व तत्त्वज्ञानाची प्रखरता दिसून येते.

१९६८ मध्ये ‘प्युअर पीपल्स कॅंपेन’ वॉशिंग्टन येथे भरविण्याची त्यांनी ठरवले होते. परंतु त्यापूर्वीच ४ एप्रिल १९६८ रोजी त्यांचा रेम्स् अल् रे या श्वेतवर्णीयाने बंदुकीने गोळी घालून हत्या केली.

किंगची हत्या झाली पण त्याचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांच्या पत्नीने १९७० मध्ये भारतात भेट दिली. किंग यांचे उर्वरित कार्य तिने पुढे चालविले आहे. मागच्या वर्षी जॉर्ज फ्लोइड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांनी मानेवर पाय ठेवून हत्या केली. अमेरीकेतील वर्णभेदाचा पाशवी चेहरा त्या घटनेतून समोर आला. या वर्णभेद मुक्तीच्या लढाईसाठी पावला पावलावर मार्टीन ल्यूथर किंग ज्यूनिअरच्या दृष्टीकोनाची गरज आजही अमेरिकेला जाणवते.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER