ढग आणि पावसाळी वातावरणाने द्राक्ष बागायतदार हवालदिल

Cloudy Wheater & Grapes

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षबागायतदार।हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. पण तांबेऱ्यासह बुरशीचा फैलाव होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

आज सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी अकरानंतर तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा आणि खानापूर तालुक्यात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. सकाळी वायफळे, आरवडे येथे पाऊस झाला. कडेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून पावसाने हजेरी लावली. वाळवा तालुक्यातील बोरगाव, ताकारी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, मसुचीवाडी, वाळवा आणि बागणी परिसरात रिमझिम पाऊस पडला.

परिणामी परिसरातील ऊस तोडी ठप्प झाल्या. पलूस तालुक्यातील पुणदी, नागराळे परिसरातही पावसाने हजेरी लावल्यामुळे ऊस तोडी थांबल्या. दुधोंडी येथेही तुरळक सरी पडल्या. अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेला द्राक्ष हंगाम अडचणीत आला आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष मण्यातील तयार साखर कमी होण्याची भीती आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीचेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER