माजी कोंग्रेस आमदाराच्या नातवाची हत्या

सोलापूर: शुल्लक कारणाच्या वादावरून उदभवलेल्या भांडणात सोलापुरातील बार्शी शहरात 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मृत्युमुखी पडलेला तरुण माजी आमदार बाबुराव नरके यांचा नातू ओंकार नरके हा आहे. कुकरीने भोसकून रविवारी दुपारी आझाद चौकातील टिंबर डेपोजवळ ओंकारची हत्या झाली.

ओंकारवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी संशयित अनिल चंद्रकांत भोकरे याला बार्शी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. ओंकारचे वडील रामलिंग ऊर्फ तात्या बाबुराव नरके यांनी बार्शी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

‘तू मला लय ज्ञान शिकवायला लागलास का, मी दारु पिऊन रोज चौकात धिंगाणा घालीन किंवा काहीही करीन, तू मला सांगणारा कोण’ असं म्हणत अनिल भोकरेने ओंकारला शिवीगाळ करुन धारदार हत्याराने छाती, गळा, मांडीवर वार केले, असं फिर्यादीत म्हटलं आहे.

जखमी अवस्थेतील ओंकारला रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारल्याप्रकरणी अनिल भोकरे या तरुणाविरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.