आजीची आठवण

Shubhangi Gokhale

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) या नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करत असतात. त्यांच्या कसदार अभिनयाने त्या लक्षात राहतात. सर्वसामान्य घरातल्या गृहिणीपासून ते गर्भश्रीमंत उद्योजिकापर्यंतच्या त्यांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या चाहत्यांना भुरळ घालतात. सध्या राजा राणीची ग जोडी या मालिकेमध्ये त्या आईसाहेब ही खानदानी घरातील सासुबाईची भूमिका निभावत आहेत. त्याचबरोबर त्यांची येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिकाही छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. या मालिकेत आजच्या युगातील सुनेला प्रोत्साहन देणाऱ्या सासूची भूमिका साकारत आहेत. सासूची दोन रूपं दाखवण्यात त्यांनादेखील वेगळीच उत्सुकता आहे. पण या निमित्ताने त्यांनी एक खास आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. राजा राणीची ग जोडी या मालिकेतील आईसाहेबांच्या हनुवटीवर एक गोंदण आहे. ही सासू साकारत असताना तिचा करारीपणा, घर सांभाळण्यासाठी तिची धडाडी हे पाहिल्यानंतर शुभांगी गोखले यांना त्यांच्या आज्जीची आठवण आली. आणि त्या आठवणीतूनच आज्जीच्या हनुवटीवर गोंदण होतं तसेच गोंदण शुभांगी गोखले यांनी या मालिकेत स्वतःच्या हनुवटीवर गोंदलं आहे.

राजा राणीची ग जोडी या मालिकेतील आई साहेबांची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. शुभांगी गोखले या भूमिकेबाबत सांगताना म्हणाल्या, की खरे तर वरवर पाहता आईसाहेब फार शिस्तबद्ध आहेत. त्या आपल्या मुलांवर सुनांवर वचक ठेवतात अशी काहीशी ओळख होते. पण खरे तर घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली मृत्यू झाल्यानंतर मुलं आणि एकूणच घर सांभाळण्यासाठी एखाद्या स्त्रीला कठोरपणा करारीपणा दाखवावा लागतो. असा करारीपणा दाखवणारी स्त्री अशी ही व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा करत असताना मला माझ्या आजीची आठवण आली. कारण वैयक्तिक आयुष्यात माझ्या आज्जीच्या आयुष्यात असाच प्रसंग ओढवला होता आणि घराचा कारभार चालवण्यासाठी प्रसंगी कठोरपणा स्वतःच्या अंगी मुरवला. खरंतर ती कठोर नव्हती पण परिस्थितीच अशी होती की तिला कठोर बनावं लागलं. हा भाव चेहऱ्यावर दाखवण्यासाठी मी काही विचार करत होते आणि त्याच वेळेला मला माझ्या आजीचा चेहरा डोळ्यासमोर आला. या बाबत चॅनेलच्या क्रिएटिव्ह टीमशी बोलले आणि अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी गोंदण असेल तर ती व्यक्तिरेखा छान होईल असं सांगितलं. माझ्या या मताला चॅनेलने होकार दिला आणि आज राजा राणीची ग जोडी या मालिकेत आईसाहेबांचा जो लूक आहे त्यामध्ये हनुवटीवर असलेले गोंदण माझ्या आजीची मला रोज आठवण देते.

प्रख्यात अभिनेते मोहन गोखले यांची पत्नी म्हणून शुभांगी गोखले यांची ओळख आहेच पण त्या पलीकडे एक सशक्त अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखले यांनी आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. खरे पाहायला गेले तर मोहन गोखले यांचं निधन झालं तेव्हा शुभांगी गोखले यांची मुलगी अभिनेत्री सखी ही खूप लहान होती आणि त्यामुळे शुभांगी गोखले यांनी देखील काही वैयक्तिक आयुष्यामध्ये परिस्थितीला सामोरं कसं जायचं याचे अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे समाजामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करत असताना स्वतःला कशा पद्धतीने कठोर आणि करारी बनवायचे याचे स्वानुभव देखील शुभांगी गोखलेंकडे आहेत. त्यामुळेच आईसाहेब ही भूमिका करत असताना त्यांना स्वतःच्या आयुष्यातील अनेक अनुभव उपयोगी पडलेले आहेत . त्यातून ही भूमिका वास्तवाकडे जाण्यासाठी उपयोगी ठरलेली आहे.

शुभांगी गोखले या जन्मजात अभिनेत्री नाहीत पण शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची आवड लागली आणि त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन रंगभूमीच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. आजवरच्या त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. विशेषतः मराठी मालिकांमधील एक साधी सरळ आणि आपल्या आईसारखीच वाटावी अशी आई ही भूमिका त्या नेहमीच अभिनयाने जिवंत करत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER