पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक; तलाठी जबाबदार : सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीची रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. ग्रामसेवक आणि तलाठी यांनी पंचनामे करताना एकही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्या. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचे प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आदेश देत पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांनीही पंचनाम्याबाबत यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी केले.

पालकमंत्री पाटील यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन कोवाड येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील शेत पिकांचे नुकसान, सुरु असणारे पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये सुरु असणारे पंचनामे ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा. पंचनामे करण्यापूर्वी ग्रामस्थांना अदल्यादिवशी त्याबाबत गावांमध्ये दवंडी देवून कळवा. राज्य शासन भरपाई देण्यासाठी पावले उचलत असून लवकरच मदत दिली जाईल. वादळामुळे शेतात पडलेला ऊसाचे लवकर गाळप व्हावे, यासाठी यादी करुन कृषी विभागाने कळवावे.
किणी, कोवाड येथील भात पिकाचे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांशी पालकमंत्री पाटील यांनी संवाद साधला. श्रीमती रुक्मिणी गिरी यांनी आम्ही दुसऱ्याचे शेत कसायला घेतले असून अतिवृष्टीमुळे आणि वादळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी काळजी करु नका, शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा दिला.

दुंडगे, कुदनूर गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. या पुलाला संरक्षित कठडा नसल्याने हा पूल धोकादायक होत आहे. या पुलावरुन व्यक्ती वाहून जाण्याच्या घडलेल्या घटनेची माहिती आमदार राजेश पाटील आणि ग्रामस्थांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. या पुलाबाबत लवकरच बैठक घेवून, हा‍ पूल ग्रामस्थांसाठी सुरक्षित केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी गडहिंग्ल विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जि.प. सदस्य कल्लाप्पा भोगन, अरुण सुतार, गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, दुंडगेचे सरपंच राजेंद्र पाटील आदी अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER