
गोंदिया : ग्रामीण भागातील राजकारण आणि विकासासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram Panchayat Election Results) सोमवारी (दि. १८) जाहीर झाले. निकालानंतर स्थानिक सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या पक्षाची सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचे दावे केले आहेत. एकूण १८१ ग्रामपंचायतींपैकी ६९ ग्रामपंचायतींवर भाजपने, ८१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे, तर ३१ ग्रामपंचायतींवर अपक्षांची सत्ता आली आहे.
ही बातमी पण वाचा:- महाविकास आघाडी पिछाडीवर, विदर्भात भाजपच मोठा भाऊ
जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, यापैकी ८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी करण्यात आली. यात भाजपने ६९, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ८१ ग्रामपंचायतीत वर्चस्व स्थापन करण्यात यश आल्याचे दावे – प्रतिदावे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी केले आहेत.
पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार गोंदिया तालुक्यात भाजप १४, काँग्रेस – राष्ट्रवादी ६, अपक्ष १७, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजपला फिफ्टी फिफ्टी जागा मिळाल्या असून, एका ग्रामपंचायतीवर अपक्षांचे वर्चस्व आहे. सालेकसा तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींवर भाजप आणि ३ ग्रामपंचायतींवर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. देवरी आणि गाेरेगाव तालुक्यात सर्वच पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाची सत्ता आल्याचे दावे – प्रतिदावे केले आहेत.
मात्र, याचे नेमके चित्र हे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर हाेऊन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला