सोशल मीडियावर ग्रामपंचायत प्रचाराचा बार!

Gram Panchayat Campaign - Social Media

सांगली : जिल्ह्यातील गावांगावांत राजकीय धुरळा उडू लागला आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. सोशल मीडियावर प्रचाराच्या तोफा धडाडत असताना दुसरीकडे गावातील तरुण मतदार योग्य उमेदवार निवडीसाठी जागरुक होताना दिसत आहे.

आता सोशल मीडिया उमेदवारांच्या मदतीला आला आहे. अनेक उमेदवारांचे वेगवेगळे व्हिडीओ आणि ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आपला प्रचार करत आहेत. पैशाच्या नादी लागू नका, आता नाहीतर पुन्हा नाही, आपला माणूस हक्काचा माणूस, इतिहास वाचायला नाही तर रचायला येतोय, अशा हटके घोषणांचा वापर करून उमेदवार आपला प्रचार करत आहेत.

सोशल मीडियावर कधी न चमकणारे सध्या प्रचाराच्या माध्यमातून झळकत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या अनुषंगाने वॉर्ड बैठका, गाव बैठका, घरोघरी व चौकाचौकांत रणनीती ठरवण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. यंदा प्रचार फेरीआधी सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. अनेक व्हिडीओ, ऑडिओ व मिक्सिंग सुरू आहे काहींनी तर भावी सरपंच, नगरसेवक अशी पदे लावून प्रचारतंत्र अवलंबले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच स्थानिक पुढाऱ्यांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली होती. राज्य सरकारने गाव पुढाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर (Gram Panchayat Election) जाहीर होणार असल्याने आता पॅनलचा खर्च करायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER