पदवीधराकांची आपसूक नोंदणी व्हावी

Jayant Asgavkar-Arun Lad

Shailendra Paranjapeपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार पाठवण्यासाठीची निवडणूक प्रक्रिया काल पूर्ण झाली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अपवाद वगळता महाराष्ट्रभर निवडून आले. भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला. पुणे विभागात अरुण लाड (Arun Lad) आणि जयंत आसगावकर (Jayant Asgavkar) गुरुजी निवडून आले.

या निव़णुकीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि पहिल्या पसंतीची मते, मग दुसऱ्या पसंतीची मते या साऱ्या गुंतागुंतीमुळे मतमोजणीच्या वेळी पत्रकारही कंटाळून जातात आणि शेवटी उमेदवारवगळता बाकी सर्वांचाच उत्साह संपलेला असतो, हा नेहमीचा अनुभव आहे. पण यंदाच्या निवडणुकीत पुणे विभागात अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांचा कोटा मिळवला आणि विक्रम नोंदवत ते विजयी झाले. विशेष म्हणजे पुणे विभागात या निवडणुकीत ६४ उमेदवार असल्याने मतमोजणी खूपच लांबेल, असं आधी वाटत होतं पण लाड यांनी पहिल्या फेरीतच विजय मिळवल्याने पसंतीक्रमाची मतं मोजण्याची वेळच आली नाही.

शिक्षक मतदारसंघात मात्र ३४ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी झाल्यानंतर आसगावकर विजयी झाले. शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार रिंगणात होते आणि भारतीय जनता पुरस्कृत जितेंद्र पवार हे तीन नंबरला गेले तर विद्मान आमदार दत्तात्रय सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

पुणे विभागातल्या निवडणुकीत संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. मुळात ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असून त्यांच्या कुटुंबाची पतंगराव कदम यांच्याशी परंपरागत स्पर्धा आहे. एकूणातच भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात ताकद अत्यल्प म्हणावी अशीच आहे. त्यामुळे भाजपाला उमेदवार शोधावा लागतो आणि बहुतांश वेळा तो कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नाराज गटातला एखादा नेता कार्यकर्ता असतो. कोल्हापूरमधे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शिवसेनेसह कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस एकवटले आणि त्यांनी कोल्हापूरचा (Kolhapur) मतदानाचा टक्का वाढवला. त्याचा लाट यांच्या विजयात मोठाच हात आहे.

नातेगोते आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध पॉवरफुल कुटुंबांचे परस्परसंबंध हेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. संग्राम देशमुख यांचे साडू असूनही सतेज पाटील यांनी ज्या प्रकारे कोल्हापुरात नाकाबंदी केली होती, त्याचे प्रतिबिंबही निवडणूक निकालात पडलेच आहे. साताऱ्यात शशिकांत शिन्दे, सांगलीत विश्वजीत कदम, कोल्हापुरात सतेज पाटील, सोलापुरात विजयसिंह मोहिते-पाटील या सर्वांनीच लक्ष घातल्याने काय होते, हेही दिसून आले आहे.

यंदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी केलेल वक्तव्य आणि त्याचे उमटलेले पडसाद हे भाजपाच्या उमेदवाराला भोवले, असं म्हणायला नक्कीच वाव आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. हे निकाल म्हणजे वाचाळांना चपराक आहे, हे त्यांचं वाक्य सूचक आहे. शरद पवार यांनी तर चंद्रकांत पाटील यांचं बोलणं आपण मनावर घेत नाही कारण ते विनोदी स्वभावाचे आहेत, असं सांगून पाटील यांना जागा दाखवली होती. मात्र पवार यांची राज्यभरातले निकाल हे महाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कामाला दिलेली पावती आहे, ही प्रतिक्रिया डिबेटेबल आहे.

पदवीधारकांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी स्वतःची नोंदणी करावी लागते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजतागायत पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा निकड बहुतांश पदवीधारकांना नसते. त्यामुळे मतदार नोंदणी अभियानं ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून हाती घेतली जातात. दुसरे म्हणजे नव्यानं तयार केलेली मतदारयादी हाही चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे यात कायमस्वरूपी बदल करण्याची गरज आहे.

राज्यातल्या सर्व पदवीधारकांची माहिती विद्यापीठांकडून निवडणूक आयोगाकडे डिजिटल स्वरूपात पाठवली जावी आणि बहुतांश पदवीधारकांचे बँक खाते, आधार अशी माहिती सरकारकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहेच. परराज्यातून वा परदेशातून पदवी घेऊन महाराष्ट्रात पदवीधारकांच्या निवडणुकीत मतदान करू इच्छिणारे अपवादानेच असू शकतील. पण महाराष्ट्रात शिकून पदवीधर झालेल्या सर्वांचीच नावं थेट निवडणूक आयोगाकडे पाठवता येऊ शकतील. तसे झाल्यास पदवीधर मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज उरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER