ग्रा. पं. निवडणूक : उमदेवारी, जात पडताळणी अर्ज ऑफलाईनही स्वीकारणार – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज आणि उद्या ३० डिसेंबर रोजी जात पडताळणी आणि उमेदवारी अर्जही ऑफलाईन भरता येणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (caste verification form can submit offline says dhananjay munde)राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर आणि उद्या ३० डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारा, असे निर्देश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून सांगितले. अर्ज स्वीकारण्याच्या खिडक्या वाढवा तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश देतानाच सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवर लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली.

ऑफलाईन अर्ज भरण्याची वेळ वाढवली

राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि तीन दिवसांच्या शासकीय सुट्यांमुळे अनेक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी आल्या होत्या. म्हणून उमेदवारांना उद्या ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. सोबत अर्ज भरण्यासाठीची वेळही वाढवून दिली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. साडेपाच वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारी अर्जही स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता आतापर्यंत ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER