मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्या सोडविणार : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई : राज्यातील मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्यातील अर्थसहाय्यप्राप्त मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या विविध समस्या सध्या प्रलंबित आहेत. या समस्यांसंदर्भात आज शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. धनंजय मुंडे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना शासनाने निधी दिला आहे. या देण्यात आलेल्या निधीबाबत महसूल विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हे संयुक्तपणे तपासणी करतील, असे या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सांगितले. दोन्ही विभागांच्या तपासणी अहवालानंतर, मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे धनंजय मुंडे म्हणाले. समस्या सोडविल्यानंतर उद्योग उभारणीची सर्व कामे ही संबंधित यंत्रणेला वर्ग करण्यात येतील, असेही यावेळी मुंडे यांनी स्पष्ट केले.