अनलॉक -४ : मेट्रो सुरू करायला परवानगी, मात्र शाळा बंदच राहणार

Metro

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अनलॉक-४ साठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे  जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. अनलॉक-४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. अनलॉक- ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक-४ मध्ये केंद्र सरकारनं सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय यासह धार्मिक सभा घेण्यास परवानगी दिली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधनं घालण्यात आली आहेत. एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.

त्याचबरोबर कोरोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमांचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यापुढे केंद्राच्या परवानगीशिवाय कन्टेनमेंट झोन बाहेर जिल्हा, तालुका, शहर किंवा गावात लॉकडाऊन करता येणार नाही. देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. अनलॉक-४ मध्ये केंद्र सरकारकडून चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा (विशेष विमानसेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER