विमानाची परवानगी नसूनही राज्यपाल विमानतळावर गेले; मुख्यमंत्री कार्यालयाची स्पष्टोक्ती

मुंबई : राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याआधी राज्यपालांना (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) विमान उपलब्ध झाले अथवा नाही याची खात्री करून घ्यावयास हवी होती. मात्र त्याची खातरजमा न करता राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, अशी स्पष्टोक्ती राज्य शासनाने (Govt Thackeray) दिली आहे.

राजभवनाने राज्यपाल महोदयांना शासकीय विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य सरकारकडे विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा नियम आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप पाठवण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर घेऊन जाणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खातरजमा न केल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.

वस्तुतः राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनानेदेखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER