गोविंद स्वरूप, उत्तम संशोधक आणि माणूसही…

Govind Swarup Editorial

Shailendra Paranjapeप्रा. गोविंद स्वरूप (Govind Swarup) गेले. देश २१ व्या शतकात अनेक विषयांमधे जागतिक स्पर्धात्मक होत असताना स्वरूप यांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या काळात परदेशातल्या अनेक संधी खुणावत असताना आणि त्या विषयांमधे परदेशात अनेक पटींनी अधिक संधी असताना देशप्रेमामुळे आणि होमी भाबा, विक्रम साराभाई यांच्यासारख्या द्रष्ट्या विज्ञाननेतृत्वामुळे भारतात कार्यरत राहिलेल्या स्वरूप यांचं काम सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचायलाच हवं.

देश स्वतंत्र झाला त्या काळात पदव्युत्तर विज्ञान पदवीचं शि७ण घेतलेले स्वरूप पुढे स्टँनफर्डसारख्या विद्यापीठातून पीएचडी करून आले. त्यांनी त्या काळातलं इमर्जिंग म्हणजे उदयास येत असलेल्या रेडिओ अँस्ट्रॉनॉमीच्या क्षेत्रात जीवनकार्य केलं. युनिव्हर्स म्हणजे विश्वाच्या अनेक रहस्यांचा शोध घेण्यासाठी विश्वातली निरीक्षणं म्हणजे रेडिओलहरींची निरीक्षणं आणि त्याद्वारे विविध संधेशांचं विश्लेषण करून खगोलभौतिकी विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन केलं जातं.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च म्हणजेच टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या एनसीआरए किंवा नॅशनल सेंटर फॉर रेडिओ-अँस्ट्रॉनॉमीचे प्रो. स्वरूप संस्थापक संचालक झाले. पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर नारायणगावजवळ खोडद इथं तरंग मीटर लांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचा प्रकल्प ही स्वरूप यांची देशाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.

खोडदच्या परिसरातला एखाद्या बाऊलसारखा आकार, चारही बाजूंनी असलेले डोंगर आणि त्या काळात म्हणजे तीस वर्षांपूर्वीच्या काळात या भागात तुलनेने खूप कमी असलेले रेडिओलहरी प्रदूषण, या कारणांमुळे खोडदची निवड स्वतः स्वरूप यांनी केली होती. तीसहून अधिक लेन्सच्या सहाय्याने एकत्रितपणे कार्यरत असलेल्या या महाकाय रेडिओदुर्बिणीच्या निरीक्षणांचा लाभ आज जगभरच्या संशोधकांना होत आहे.

कल्याणमधे स्वरूप यांनी उभारलेली दुर्बीण असो की उटीच्या जागतिक पातळीवर नोंद घेतलेल्या दुर्बीण प्रकल्पातला त्यांचा सिंहाचा वाटा असो, स्वरूप यांच्याशी बोलताना कधीच आपण एखाद्या जागतिक महत्तम संशोधकाशी बोलतोय, असं वाटायचं नाही. त्यांचं बोलणं एखाद्या लहान मुलाशी साधर्म्य असलेलं होतं. त्यांचं कुतुंहल आणि विशे,तः सायन्स कॉँग्रेसच्या वेळी लहान मुलांशी संवाद साधताना चमकणारे ड. स्वरूप यांचे डोळे बघितले की आश्वस्त व्हाय.ला व्हायचं की भारतात चित्र अगदीच काही ब्लीक किंवा धूसर नाहीये.

नव्वदीच्या पुढे जगलेले स्वरूप कायम आशावादी राहिले. भारतीय तरुण संशोधक जागतिक पातळीवर ठसा उमटवण्याच्या तोडीचे आहेत, हा विश्वास त्यांना कायम असायचा. खोडदच्या दुर्बीणीच्या प्रकल्पानंतर देशपातळीवर नावाजल्या गेलेल्या आयसर या संस्थेची मूळ कल्पना डॉ. स्वरूप, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. पॉल रत्नस्वामी अशा वैज्ञानिकांची पण त्यातही अर्गेसर होते ते स्वरूप. आज आयसरला देशपातळीवर जे स्वरूप प्राप्त झालेय त्यात स्वरूप यांचा वाटा मोठा आहे.

पुण्यात . रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सायन्स कॉँग्रसचे अधिवेश झाले होते. त्या वेळी बालवैज्ञानिकांच्या मेळाव्यात प्रा. स्वरूप यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्या वेळी एका लहानग्यानं स्वरूप यांना एक प्रश्न विचारला होता. आकाशात इतके सारे ग्रह तारे आहेत आणि तुम्ही त्यांचा अभ्यास करता पण हे सगळं तुम्हाला कळतं कसं…हा प्रश्न त्या लहानग्यानं विचारला आणि डोकं खाजवत प्रा. स्वरूप म्हणाले, खरंय…हे सगळं कसं कळतं, या प्रशानाचा वेध तर जगातले सगळेच घेताहेत. मी पण घेतोय तू पण घे.

प्रश्न लहान मुलाने विचारलेला होता तरी तो मूलभूत होता आणि म्हणूनच बडेजाव न करता त्या मुलाचं कौतुक करणारे स्वरूप कोsssहम् च्या प्रवासाला निघून गेलेत. विश्वाचं रहस्य उलगडण्यात खोडदची दुर्बीण योगदान देईलच पण स्वरूप यांनी दिलेली विज्ञानदृष्टी आणि शोध घेण्याची वृत्ती आपल्या सर्वात येवो….हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER