राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान

Bhagat Singh Koshyari

मुंबई: विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अविट ठसा उमटविणार्‍या महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर, न्यायवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे, विमानचालन क्षेत्रातील उद्योजिका लिना जुवेकर – दत्तगुप्ता, डॉ. उज्वला जाधव व बेलिन्डा परेरा (समाजकार्य) व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका शिबानी जोशी यांना यावेळी प्रशस्तीपत्र व भगवदगितेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रिया सावंत यांच्या लीडिंग लेडी फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मातृशक्तीचा सन्मान हा आपला सन्मान असल्याचे सांगून महाराष्ट्रात महिला विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

हिन्दी आणि इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा मराठी वृत्तपत्रांमध्ये महिला स्तंभलेखिका मोठ्या प्रमाणात लिखाण करीत असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले.

‘खासदारांनी मराठी काव्यपंक्ती, सुभाषिते वापरावी’

महाराष्ट्रातील खासदार संसदेत आवर्जून हिन्दी भाषेत बोलतात. परंतु आपल्या भाषणात ते उर्दू शेरोशायरी किंवा हिन्दी कवितांचा आधार घेतात. मराठी भाषेत विपुल काव्यभांडार, सुंदर काव्यपंक्ती व सुभाषिते उपलब्ध असून देखील त्यांचा वापर कुणी सहसा करीत नाही अशी खंत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. मराठी भाषेतील प्रेरणादायी विचार व काव्यपंक्तींचे पुस्तक असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समर्थ रामदासांचा ‘प्रभाती मनी राम चिंतित जावा’ हा श्लोक आपणांस इतका आवडला की तो पाठ करून ठेवला, तसेच लीला गोळे यांची आनंदवन भुवनी ही कादंबरी वाचल्याचे वाचल्याचे त्यांनी सांगितले.

‘गोल्डन सक्सेस स्किल्स’ पुस्तकाचे प्रकाशन
महिलांना यशाचा कानमंत्र सांगणारे प्रिया सावंत यांनी लिहिलेले ‘गोल्डन सक्सेस स्किल्स’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER