सुसंवाद साधण्यासाठी राज्यपालांचा पुढाकार, मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवले पत्र

Bhagat Singh Koshyari-CM Uddhav Thackeray

मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीवरुन दीर्घकाळ रंगलेला वाद, अधुनमधून होणाऱ्या शाब्दिक लढाया आणि काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विमानातून प्रवास करण्यास नाकारलेली परवानगी, अशा अनेक कारणांमुळे समोरासमोर उभे ठाकलेले महामहिम भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यातील बंद पडलेला संवाद पुन्हा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. यासाठी खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक पाऊल टाकले आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने सध्या राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. अशावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संवाद पुन्हा सुरु होणे, ही सकारात्मक बाब ठरु शकते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छापत्र पाठवले आहे. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असा मजकूर राज्यपालांच्या पत्रात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारशी संवाद साधण्यासाठी राज्यपालांच्या माध्यमातून आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांचे आतापर्यंत फारसे पटलेले नाही. मात्र, आता संकटाच्या काळात तरी हे दोघे हातात हात घालून चालणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button