राज्यपाल समजूतदार, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील – भुजबळ

Governor & Bhujbal

नाशिक :- राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी २१ नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) योग्य निर्णय घेतील. ते समजूतदार आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

राज्य सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी नाशिकमधील शाळा सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले. आम्ही नाशिकमधील शाळांच्या बाबतीत उद्या बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर निर्णय घेणार आहोत. मुलांना शाळेत पाठवायला पालकांची संमती मिळते की नाही तेही बघितलं पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळात वेगवेगळी मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये, अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : विधानपरिषदेसाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर राज्यपाल कुठली भूमिका घेणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER