विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

Governor Bhagat Singh Koshiyari

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा सामायिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला.

विद्यापीठांनी आपल्या आकस्मिक निधीचा वापर करून परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, मास्क व सॅनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

व्हर्च्युअल क्लास रूम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाईन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

प्रत्येक विद्यापीठाने आपल्या परिसरामध्ये स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रित लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशीही सूचना राज्यपालांनी केली.

विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या वेतनाचा काही भाग शासनाला योगदान म्हणून देता येईल का, याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.

उदय सामंत :

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा सामायिकपणे घेता येतील का, याचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंची समिती गठित केली असून समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी राज्यपालांना दिली. विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत तसेच कमी किमतीचे व्हेंटिलेटर निर्माण करण्याबाबत विद्यापीठांच्या प्रयत्नांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रशिक्षित स्वयंसेवक मदतकार्यात देत असलेले योगदान, तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न तसेच आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.