छगनही सर्वपक्षीय होवो ; राज्यपालांची भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर?

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन मोठं विधान केलं आहे. कोश्यारी यांनी भाषणाच्या ओघात थेट राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली आहे. थेट राज्यपालांनीच भुजबळांना अप्रत्यक्षपणे ही ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

नाशिकमधील सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना भाजपमध्ये येण्याची अप्रत्यक्ष ऑफर देवून खळबळ उडवून दिली. माझ्यासाठी सगळेच देवमामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देवमामलेदारांना प्रार्थना करा म्हणजे सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यावेळी राज्यपालांनी ते मुख्यमंत्री असतानाचे किस्से ऐकवतानाच त्यांच्या कार्यपद्धतीची माहितीही दिली. मी मुख्यमंत्री असताना अधिकाऱ्यांना मोकळ्या हाताने काम करायला सांगायचो. डर जाओगे तो मर जाओगे, असे मी अधिकाऱ्यांना सांगायचो, असे कोश्यारी म्हणाले.

प्रभू रामचंद्रासोबत वानर नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळे नसते तर लक्ष्य साध्य झाले नसते . त्यामुळे आपण देखील एकत्र मिळून काम करावं, असे सांगतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी थोडा प्रयत्न केला तर भुजबळांचे बॉस असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील आशीर्वाद त्यांना मिळेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER