राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार

Governor Bhagat Singh Koshyari felicitates Covid Warriors

जगभरात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जास्त असला तरीही भारतात तो अतिशय कमी होता, याचे मुख्य श्रेय आपले सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस व निष्ठेने कार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे जाते. येत्या १ – २ महिन्यात देशातील करोनाचा मृत्युदर १ टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.

करोना संक्रमणाच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा ॲण्ड आलब्लेस, गोकुलदास तेजपाल (जीटी) आणि सर ज. जी. समूह या शासकीय रूग्णालयातील कोविड योद्धे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर्स, विभागप्रमुख, मॅट्रन व स्वच्छता निरीक्षकांचा बुधवारी राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

रूग्णांना शासकीय रुग्णालयात अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने उपचार देण्यात येत आहेत. आपण स्वत: रुग्णांना नेहमी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतो असे सांगून राजभवन येथील अनेक करोनाबाधित कर्मचारी शासकीय रुग्णालयातील उपचारांमुळे पूर्णपणे बरे झाले आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यरत असताना करोनामुळे मृत्यू झालेले पोलीस, स्वच्छता कर्मचारी व वैद्यकीय कर्मचा-यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटूंबियांच्या सुदृढ आरोग्य लाभावे अशी भावनाही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

‘आयसीयुमध्ये करोना रुग्णाजवळ बसुन रुग्णांचे प्राण वाचवले’ : डॉ लहाने

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मॅट्रन्स), स्वच्छता निरीक्षक हे सच्चे करोना योद्धे असल्याचे सांगून आपल्याला संसर्ग होऊ शकतो याची पूर्ण जाण असून देखील त्यांनी सर्वांना हिम्मतीने सेवा दिली असे वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

जी.टी. व सेंट जॉर्ज रुग्णालयातील करोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण खाजगी रुग्णालायांपेक्षा देखील कमी असल्याचे सांगताना प्रसंगी डॉक्टरांनी आयसीयु मध्ये रुग्णशय्येजवळ बसुन गंभीर रुग्णांचे प्राण वाचविले असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

करोना विषाणू संदर्भात अधिक माहिती नसल्याने सुरवातीला अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. मात्र, या परिस्थिततही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत राहिले,असे डॉ लहाने यांनी सांगितले.

राज्यात पूर्वी केवळ तीन करोना चाचणी प्रयोगशाळा होत्या मात्र आज १५४ लॅब, १४९० व्हेंटीलेटर्स, १६५० आयसीयु बेड, तीन लाख सात हजार बेड, १८ मेडिकल कॉलेज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील करोना मृत्युदर ५० टक्के होता, तो आज २.६ टक्के इतका कमी असून मृत्युदर शुन्य टक्क्यांवर आणण्यासाठी कार्यरत असल्याचेही डॉक्टर लहाने यांनी सांगितले.

यावेळी डॉ. लहाने, ज जी समूह रूगणालयाचे अधिष्ठाता डॉ रणजित माणकेश्वर, राज्याच्या कोविड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर, यांसह ३३ कोव्हीड वॉरियर्सचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजभवन कर्मचार्यांपैकी करोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अनुभव कथन केले. डॉ. आकाश खोब्रागडे यांनी आभार प्रदर्शन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER