कर्तव्य समजून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Human Rights Day Prog 3

मुंबई: नागरिकांनी मानवी हक्काचे संरक्षण हे कर्तव्य समजून केले पाहिजे. तसेच गरीब, दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज मानवी हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष एम.ए.सईद म्हणाले, तरुणांनी स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा या संबंधातील हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी तरुणांनी काम केले पाहिजे. नागरिकांनी आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याचेही पालन केले पाहिजे.

यावेळी महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी ‘मानवी हक्क चळवळ व सायबर कायदा’ याविषयी माहिती देऊन व्यक्तींनी मानवी हक्काबरोबरच कर्तव्यालाही महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले.

यावेळी राज्य मानवी हक्क आयोगाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही.के.गौतम, आय.जे.एम. साऊथ एशियाचे संजय माकवान, मुंबई विद्यापीठाच्या प्रा.रश्मी ओझा तसेच मानवी हक्क चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावर्षीचे मानवी हक्क चळवळीचे ब्रीद वाक्य ‘स्टँड अप फॉर ह्युमन राईटस्’ असे आहे.