राज्यपाल नियुक्त आमदार : उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार

- कंगना विरुद्ध सरकार वादात केलेल्या मदतीचे बक्षीस

urmila matondkar

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागेसंदर्भात उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती आहे. उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषेदवर जाणार, अशी कालपासून चर्चा होती.

उर्मिला काँग्रेसमध्ये गेल्या होत्या, नंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्या शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारणार का आणि त्यांना शिवसेना प्रस्ताव देणार का याबाबत साशंकता होती. मात्र, एका वृत्त वाहिनीने उर्मिला यांनी शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारल्याचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवत असल्याची चर्चा आहे.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे निश्चित केली जातील. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवतील, अशी शक्यता आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा आरोप करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात काँग्रेसला सो़डचिठ्ठी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER