पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून पुरेशा उपाययोजना -बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar

मुंबई: दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने पुरेशा उपाययोजना केल्या असून जिल्हा स्तरावर टंचाई निवारण कक्ष सुरु केले असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत नियम 293 वरील प्रस्तावास उत्तर देताना दिली.

43 हजार गावे-वाड्या यासाठी 1 हजार 135 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर असून 2018 च्या जनगणनेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात मराठवाडा विभागात 3 हजार 522, नाशिक 1 हजार 534, पुणे 1 हजार 191, अमरावती 531, कोकण 148, नागपूर 53 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याबाबत टँकर परिपूर्ण भरणे, जीपीएसनुसार टँकरच्या नोंदी व बिल, लॉग बुक तपासणे, ग्रामस्थांची स्वाक्षरी अशा विविध तपासण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून गैरप्रकारास आळा बसेल असे श्री. लोणीकर यांनी सांगितले.

राज्यात 10 हजार 630 विहिरी व बोअर पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच त्याच्या मोबदल्यातही 50 टक्के वाढ केली आहे. 2 हजार 544 तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच छावण्यांतील पशुधनासाठी मोठी जनावरे 35 लिटर, लहान जनावरे 10 लिटर, शेळ्या-मेंढया 3 लिटर प्रतिदिन पाणी पुरवठ्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला असल्याचे त्यांनी सांगितले.