कोकणच्या पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशील- मदन येरावार

Madan Yerawar

मुंबई: राज्य शासन कोकणच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असून पर्यटकांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाईल, अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधान परिषदेत दिली.

कोकण पर्यटन व पर्यटकांची सुरक्षा याविषयीची लक्षवेधी सूचना सदस्य निरंजन डावखरे यांनी आज विधानपरिषदेत मांडली होती, या लक्षवेधीस उत्तर देताना श्री.येरावार बोलत होते.

श्री.येरावार म्हणाले, कोकणच्या पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्न करीत असून तेथील पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटकांचे साहसी क्रीडा प्रकार याबाबत लवकरच नवीन धोरण ठरवू. कोकण पर्यटनाबाबत तेथील लोकप्रतिधींसोबत मुख्यमंत्री यांची लवकरच बैठक घेऊ.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अख्यत्यारीतील खाडी व समुद्र किनाऱ्यावर चालणाऱ्या जलक्रीडा प्रकल्पासाठी मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात येते. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या 70 व्या बैठकीत जलक्रीडा प्रकल्प धोरणास मान्यता मिळालेली आहे. सदर धोरणानुसार महाराष्ट्रातील 720 कि.मी. क्षेत्रातील प्रामुख्याने जुहू (जिल्हा मुंबई उपनगर), केळवा व राजोडी (जिल्हा पालघर), मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागांव, पालाव, रेवदंडा, काशिंद, मुरुड, दिवेआगर व श्रीवर्धन (जिल्हा रायगड), रत्नागिरी, गणपतीपुळे, मुरुड व कर्दे (जिल्हा रत्नागिरी) व मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) जलक्रीडा प्रकल्पासाठी परवानगी देण्यात येते.

या चर्चेत सदस्य सर्वश्री ॲड. हुस्नबानू खलिफे, मनिषा कायंदे, भाई जगताप, अनिकेत तटकरे, भाई गिरकर, प्रसाद लाड आदींनी सहभाग घेतला.