शासनाकडून निधी कमी पडणार नाही सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य सोहळा करु – सतेज पाटील

कोल्हापूर :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य दिव्य साजरा करु. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले.

बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठा देण्यासाठी शासनाचा पुढाकार – हसन मुश्रीफ

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी भेट देवून सोहळ्याच्या नियोजनाबाबत आज बैठक घेतली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.

माणगावमधील मागासवर्गीय समाजाने स्मारकासाठी पाच एकर जागा देवून समाजाने मोठं मन दाखवलं आहे. त्यांच्या या दातृत्वातून उतराई होवू शकत नाही. जिल्हाधिकारी यांनी या समाजाला जवळपास पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली.

ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ अध्यक्षीय भाषणात म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या सारख्या हिऱ्याला शोधून त्यांच्या परदेशी शिक्षणाला मदत केली. संपूर्ण देशाचा नेता म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पुढे आणले. अशा ऐतिहासिक परिषदेचे नियोजन आपणा सर्वांना करावे लागणार आहे. या स्मारकाचा उल्लेख राज्याच्या अंदाज पत्रकात व्हावा, अशी विनंती वित्तमंत्र्यांना करणार असल्याचेही ते म्हणाले. सगळ्या गावाने पुढे येवून ज्योती कांबळे या मागासवर्गीय महिलेला सरपंच पद दिलं, आणि राज्यालाच नव्हे तर देशाला वेगळा संदेश दिला. अशा गावाला मी सलाम करतो, अशा शब्दात ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी गौरव केला.