शिवरायांचा आदर्श स्वीकारून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत – अमोल कोल्हे

Amol Kolhe

नवी दिल्ली : शिवरायांनी शेतकऱ्यांसंबंधी जी धोरणे आखली होती त्याचप्रमाणे सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेत केली. अमोल कोल्हे लोकसभेत बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका, असं शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं.

शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे. शेतीसंदर्भातील प्रश्नांवर काहीतरी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ‘दरवेळी प्रश्नोत्तराच्या तासात शेतीसंदर्भात प्रश्न विचारले असता शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातील असेच उत्तर सरकरकडून दिले जाते. मात्र आज शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये रोजगार मिळतो. हे १७ रुपये म्हणजे त्यांचा सन्मान आहे की चेष्टा हेच समजत नाही. तसेच वर्षाला सहा हजार दिले तरी ५०० रुपये महिना या हिशेबाने घर चालवता येते का? ५०० रुपये महिना दिल्यास शेतीची देखभाल करणे शक्य आहे का? असे प्रश्नही कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केले.