सरकारी कांदा २२ रुपये किलो; पण विकला जात नाही !

government-price-of-onion-is-22 rs-per-kg-Ramvilas Paswan

नवी दिल्ली : देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सरकारी कांदा २२ रुपये किलो विकला जातो आहे; पण कोणी घ्यायला तयार नाही, असे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, लोकांना कांदा स्वस्त मिळावा म्हणून १८ हजार टन कांदा आयात करण्यात आला असून तो २२ रुपये प्रतिकिलोने विकला जातो आहे.

सरकारने आजपर्यंत १८ हजार टन कांदा आयात केला; मात्र अनेक प्रयत्न करूनही आतापर्यंत फक्त २००० टन कांदाच विकला गेला. आसाम (१०,००० टन), महाराष्ट्र (३४८० टन), हरियाणा (३००० टन) आणि ओडिशा (१०० टन) या राज्यांनी कांद्यांची मागणी केली होती. मात्र, आता या राज्यांनी आयात केलेला कांदा खरेदी करण्यास नकार दिला.

नाफेड करणार ‘बफर स्टॉक’

२०२० साठी कांद्याचा बफर स्टॉक वाढवून एक लाख टन करण्यात येणार आहे. सरकार नाफेडतर्फे कांदा साठवते. नाफेड मार्चपासून जुलैपर्यंत रब्बीचा निघणारा कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे. कांद्याच्या प्रमुख उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तसेच नवा कांदा बाजारात कमी आल्याने कांद्याच्या किमतीत तेजी आहे. आजही किरकोळ बाजारात कांदा ७० ते १०० रुपये दराने विकला जातो आहे.