सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – जितेंद्र आव्हाड

मुंबई  : सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विकासकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केले. सी.आय.आय. रिअल इस्टेट परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, गृहनिर्माण क्षेत्रात विकासकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी शासनाकडे मांडाव्यात. त्या समस्यांचे त्वरित निराकरण केले जाईल आणि सरकारतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल. निर्धारित वेळेत आता विकासकांना यापुढे सर्व परवानग्या देण्यात येतील. ‘म्हाडा’मध्ये जास्त दिवस फाईल प्रलंबित राहू नये अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

भास्कर जाधव यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल?

मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, मुंबईतील कामाठीपुराचा नियोजनबद्ध पुनर्विकास करण्याचे शासनाने ठरवले आहे. कामाठीपुरा हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून त्यालगतच ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जे.जे. रुग्णालय, ग्रँट रोड स्टेशन यासारखे महत्त्वाचे भाग आहेत. कामाठीपुराचा विकास करून तेथे मुंबईतील सर्वात मोठे व्यापारी केंद्र उभे करण्यात येईल. यापुढे ‘म्हाडा’चे जे मोठमोठे प्रकल्प आराखडे राहतील, त्यामध्ये ‘म्हाडा’ची संयुक्त भागीदारी असेल, असेही श्री.आव्हाड म्हणाले.