वाद टाळण्यासाठी ठाकरे सरकारचा निर्णय; अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांची नियुक्ती रद्द

Ravindra Waikar - Arvind Sawant

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर अरविंद सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सावंत यांची नियुक्ती केंद्रीय पातळीवर समन्वयक म्हणून करण्यात आली होती. तर मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज झालेल्या रवींद्र वायकर यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक म्हणून करण्यात आली होती. मात्र आता अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या दोन्ही नेत्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप भाजपाकडून केला गेला होता. त्यामुळे अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर या दोन्ही नेत्यांची नियुक्ती राज्य शासनाने परिपत्रक काढून केली होती. त्यात या नेत्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने त्यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते, सुविधा याबाबत वादंग निर्माण होऊ शकतं. ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमानुसार भाजपाने या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली होती. अद्याप या नेत्यांनी पदाचा कारभार स्वीकारला नसताना नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का? : चंद्रकांत पाटील