सरकारमध्ये कृषी खाते आहे का? – विखे पाटील

vikhe-patil

अहमदनगर : सामाजिक बांधीलकीतून कृषि विज्ञान केंद्राचे काम दिशादर्शक आहे, शेती करताना शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न उभे होतात. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, पण या राज्य सरकारमध्ये कृषी खाते आहे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून अनेक कृषी योजना बंद पडल्या आहेत, शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर येत नाही, त्यामुळे राज्य सरकार कृषी क्षेत्राला विसरले आहे का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला. बाभळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्र(पायरेन्स), आत्मा, पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकाऱ्याने आयोजित तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आल्यास महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ – सुप्रिया सुळे

यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करतते म्हणाले की, शेती व्यवसायासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी कृषी विज्ञान केंद्र सुरू करताना शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि हवामान बदल यासाठी केंद्राची मदत होईल हा विचार केला होता. या केंद्राने चांगले काम करताना नीती आयोगाचे अ मानांकन मिळवले आहे. महिला बचत गटांना उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ प्रदर्शनातून उपलब्ध व्हायला हवी. त्यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे, मुरघास उत्पादनासाठी मदत करावी.

परतीच्या पावसाने राज्याकडे पाठ फिरवली. शेतकऱ्यांचा हातून खरीप हंगाम निसटला. सरकार सहकाऱ्याची भूमिका घेत नाही. घोषणांची अंमलबजावणी होत नाही. दूध दर वाढ, कर्जमाफीची घोषणा केवळ पोकळ ठरली. धरणांमध्ये पाणी आहे पण शेतकऱ्यांना ते मिळेलच याची खात्री वाटत नाही. समन्यायी पाणी वाटप कायद्यावर टांगती तलवार आहे. शेतकरी चोहोबाजूने अडचणीत सापडला आहे, याकडे विखे यांनी लक्ष वेधले.

यावेळी कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, बारामती कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, नाबार्डचे शिलकुमार जगताप, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर आदी उपस्थित होते.