
जुन्या पिढीतले ज्येष्ठ अभिनेते ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार (Dilip Kumar) यांनी वयाची ९८ वर्षे पूर्ण करून ९९ वा वाढदिवस शुक्रवारी साजरा केला. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ चा. संख्यात्मकदृष्ट्या त्यांनी खूप जास्ती चित्रपट केलेले नाहीत; पण इम्पॅक्टचा विचार केला तर शतकाचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह अनेक अभिनेत्यांवर दिलीपकुमार यांचा प्रभाव आहे, हे मान्यच करावं लागतं.
दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेलं ‘साला मैं तो साब बन गया…’ हे गाणं आठवलं. ते आठवण्याचं कारण म्हणजे वृत्तपत्रातून आलेली एक मोठी बातमी. ती म्हणजे राज्य सरकारनं एक आदेश काढून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड म्हणजे पोषाख संहिता आणलीय. दिलीपकुमार त्या गाण्यात म्हणतात, सूट मेरा देखो, बूट मेरा देखो जैसे छोरा कोई लंदन का…
पोषाख माणसाचं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करतो. सामान्यतः हे लागू पडत असलं तरी जगावेगळे गुण असलेले, कलावंत, संगीतकार, चित्रकार, सर्जनशील मंडळी यांची एकूणच जीवनाकडे बघण्याची दृष्टी सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असते. थोर गायक वसंतराव देशपांडे लग्नाच्या पंक्तीत जेवता जेवता थांबले होते आणि समोरच्या पंक्तीत जिलबी वाढणारा काय कलात्मक किंवा मस्तपणे जिलबी वाढतोय, यातलं सौंदर्य टिपत होते. ब्युटी लाइज इन द आय ऑफ द बिहोल्डर किंवा पाहणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य दडलेलं असतं, असं म्हणतात ते उगीच नाही.
वसंतराव देशपांडे किंवा कोणत्याही कलावंताकडे असलेली निराळी दृष्टी सरकारी नोकरीत असलेल्या फार कमी लोकांकडे असू शकेल; पण त्यातले काही असेही आहेत की जे रंगीबेरंगी, चट्ट्यापट्ट्याचे शर्ट, चित्रविचित्र प्रकारची शर्ट-पँटची कॉम्बिनेशन्स घालून कार्यालयात येतात. राज्य सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित करावा लागला त्यामागे हे रंगीबेरंगी कपडे घालून मंत्रालयात येणारे लोक कारणीभूत आहेत. काही कामानिमित्त मंत्रालयात आलेल्या विदेशी शिष्टमंडळातले लोक हे असे रंगीबेरंगी लोक मंत्रालयात फिरताना बघून आणि ते अभ्यागत किंवा व्हिजिटर नसून शासकीय कर्मचारी आहेत, हे समजल्यावर चक्रावून गेले होते. त्यातूनच आता सभ्य माणसांसारखे कपडे घालायचे बंधन सरकारी कर्मचाऱ्यांवर आले आहे.
इंग्लंडच्या राणीच्या मुलाच्या कार्यक्रमाला जाताना १८८८ साली महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा वेष परिधान केला होता. माझ्या देशातले बहुतांश शेतकरी हा वेष परिधान करतात म्हणून मी तो केला आहे, असं सांगून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. स्वामी विवेकानंदांनीही अमेरिकेतील शिकागो येथे संपूर्ण जगाला भारावून टाकणारे विचार मांडताना त्यांचा संन्याशाचा वेष सोडला नव्हता.
आपापला देश, संस्कृती, भाषा यांचे अभिमान बाळगायला हरकत नाही. किंबहुना तो बाळगावाच पण इतर देश, भाषा, संस्कृती यांच्याशी उभं वैर असल्यासारखं वागू नये, हा संदेश बहुतेक संतमहात्म्यांनी दिलाय.
या संदेशात थोडासा बदल करून सरकारी कर्मचाऱ्यांना एकच विनंती करावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही तुमच्या सरकारी ड्रेस कोडप्रमाणे कपडे घाला किंवा घालू नका, पण सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही प्रतिमा बदलण्यासाठी मात्र आवर्जून योगदान द्या. माणसाची पहिली ओळख त्याच्या कपड्यांवरून होत असली तरी ती ओळख समोरच्याला खऱ्या अर्थाने पटायची असेल तर तुम्ही एक प्रोफेशनल म्हणून कार्यक्षम असायलाच हवे.
सरकारी नोकरीत माणसं काम तर शिकतातच; पण काम करण्यापेक्षा ते अडवल्यानं जास्ती फायदा होतो, हे जीवनविषक तत्त्वज्ञानही शिकतात. त्याचा अंगीकारही करतात. तो करताना आपला वेष, संस्कृती, भाषा हे भेद सगळेच विसरून जातात. त्यामुळे ड्रेस कोडमुळे होणारे तुमचे पहिले इम्प्रेशन चांगल्या सेवेतून कायम राहील, तरच हा बाह्यबदल तुमच्या अंगवळणी पडलाय असं म्हणता येईल. अंतिमतः लोकांना कोणत्याही कामासाठी सरकारी कार्यालयात जायचे म्हटल्यावर अंगावर काटा न येता उत्साह वाटला तर हा पोषाखबदल कारणी लागेल.
जाता जाता एक पुणेरी शंका- राजकारण्यांना किमान मंत्र्यांना ड्रेस कोड कधी येणार ?
शैलेन्द्र परांजपे
Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला