राज्यातले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त; विधानसभेत घोषणा

Schools

मुंबई : राज्यातल्या मागील फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आल्याची घोषणा आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केली.

या मंडळांतर्गत येणाऱ्या ८१ शाळांमध्ये २५, ३१० विद्यार्थी शिकत होते. या शाळांमध्ये आता राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. हे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय २०१६ सालच्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १० ‘ओजस शाळा’ सुरू करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये होणारे अध्ययन-अध्यापन या शाळांमध्ये होणार होते. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांच्या संलग्नतेसाठी हे मंडळ स्थापण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला तत्कालीन राज्य शासनाने ९.७० कोटी रुपये अनुदानही दिले होते.

हे मंडळ बरखास्त करण्यात आल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली. यंदा या मंडळांतर्गत प्रवेश प्रक्रियाच राबवण्यात आलेली नव्हती. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नता मिळवू इच्छिणाऱ्या मराठी माध्यमाच्या मान्यताप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, स्वयंअर्थसाहाय्यित शाळा यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले होते. राज्यातल्या १३ जिल्हा परिषद शाळाही या मंडळाशी संलग्न करण्यात आल्या होत्या.