शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत शासन सकारात्मक -आशिष शेलार

Ashish-Shelar

मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य विक्रम काळे यांनी मांडली होती त्याला उत्तर देताना श्री. शेलार बोलत होते.

श्री. शेलार म्हणाले, दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी 100 टक्के अनुदानावर असलेल्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होते. त्याचप्रमाणे दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर (20 टक्के, 40 टक्के, 60 टक्के, 80 टक्के) असलेल्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सदर शाळा 100 टक्के अनुदानावर आल्याच्या दिनांकानंतर नवीन परिभाषित अंशदान योजना (DCPS) लागू होते. वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तद्‌नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या सेवेमधील दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषिक योजना लागू झालेली आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागाने या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित केलेली आहे.

या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दाखल विविध याचिकांवर झालेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सदर प्रकरण उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठासमोर सादर करण्यात आले होते. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री कपिल पाटील, नागोराव गाणार, श्रीकांत देशपांडे आदींनी सहभाग घेतला.