
सांगली : नुकताच राज्यातील ठिकठिकाणच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला. सांगली जिल्ह्यातील एरंडोली इथला किस्सा. येथे झाले असे की, उपसंरपंच पद मिळवण्य़ासाठी तिथल्या कारभारींनी भाजप (BJP)सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. मात्र, चारच दिवसात यांना राष्ट्रवादी सोडून स्वगृहीच परतावे लागले.
गावच्या राजकारणात “सात अधिक दोन’ चे गणित जमवून उपसरपंचपद मिळवण्यासाठी या मंडळींनी पक्षांतर केले होते. मात्र, पद पदरात पडल्यानंतर चारच दिवसांत राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. उपसरपंच महेश मोरे, सदस्य आत्माराम जाधव, सचिन पोतदार, सदस्यांचे कारभारी प्रसाद चौगुले यांच्यासह कार्यकर्ते बाळासाहेब नलवडे, नितीन माने अशी या मंडलींची नावे आहेत. आमदार सुरेश खाडे यांनी यांना पुन्हा भाजपात प्रवेश दिला आहे.
काय आहे नेमकी भानगड –
गेल्या आठवड्यात या मंडळींनी राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत आणि तालुकाध्यक्ष तानाजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. एरंडोली ग्रामपंचायत निवडणुकीत या गटाच्या श्री जान्हवी पॅनेलचे सात सदस्य विजयी झाले होते. विरोधी जय जान्हवी पॅनेल व वॉर्ड दोन यांच्या आघाडीचे आठ सदस्य विजयी झाले. दोन सदस्य व्यंकोचीवाडी येथील जय हनुमान पॅनेलचे होते.
श्री जान्हवी पॅनेलला उपसरपंच होण्यासाठी व्यंकोचीवाडीतील दोन सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. त्यासाठी सात अधिक दोन अशा नऊ सदस्यांनी आणि काही नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यात एरंडोली राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष उत्तम माने, कॉंग्रेसच्या विशाल पाटील गटाचे समर्थक बी. के. पाटील यांचा समावेश होता.
या खेळीमुळे महेश मोरे यांना बिनविरोध उपसरपंच होता आले. नऊ फेब्रुवारीला त्यांची निवड झाली. त्यानंतर चारच दिवसांत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला.
ही बातमी पण वाचा : मोदी सरकारचा बुरखा पवारांनी फाडला हे बरे झाले – सामना
साभार -सरकारनामा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला