गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

Gopichand-Padalkar-Uddhav-Thackeray

मुंबई :- महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेचा थांबवलेला निधी त्वरित मंजूर करावा व जे आदिवासींना ते धनगरांना ठरल्याप्रमाणे हजारो कोटींचा निधी २०१९-२० व २०२०-२१ चा वर्ग करावा. अन्यथा धनगर समाजाच्या तीव्र रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशारा देत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) पत्र दिले आहे.

पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराजा यशवंतराव होळकर महामेष ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मागील सरकारने धनगर समाजात मागास राहिलेल्या मेंढपाळ बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केली होती. सदर योजना मेंढीपालन करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी खात्रीचा उत्पन्न स्रोत निर्माण करणारी होती. धनगर समाजाच्या उन्नतीचे द्वार असलेल्या महामेष योजनेला निधी न दिल्याने या वर्षी कोणालाही महामेष योजनेचा लाभ मिळाला नाही. तसेच गतवर्षी या योजनेसाठी जे पात्र ठरले होते त्यांचा निधीही आजपर्यंत देण्यात आलेला नाही.  यामुळे धनगर समाजाच्या मनात सरकारविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पुढे असताना मागील सरकारने घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे सरकार आपल्यावर अन्याय करत आहे का? असा प्रश्न समाजातील लोकांमध्ये उपस्थित झाला आहे. सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा धनगर समाजाच्या तीव्र रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER