शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा; भाजप आमदाराचे रोहित पवारांवर टीकास्त्र

Gopichand Padalkar - Sharad Pawar - Rohit Pawar

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वांत उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवारांनी त्यांच्या खांद्यावरून खाली मतदारसंघात उतरावे, असा खोचक सल्ला भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवारांना (Rohit Pawar) दिला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. सकाळी पावणेआठच्या सुमारास पडळकर हे पवार यांच्या मतदारसंघातील मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभे राहून व्हिडीओ बनवला व तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या ५० वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज हे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, शरद पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. अशी जहरी टीका पडळकर यांनी केली आहे.

‘रोहित पवार तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, हे तुम्हाला कळेल. मिरजगावमधील गावातील साधा रस्ता तुम्हाला करता येत नसेल आणि देशाच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते दुरुस्त करा. राज्यामध्ये तुमचे सरकार आहे. येत्या काही दिवसांत कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात-लवकर दुरुस्त करावे, मग बाकीच्यांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो.’ असा टोला पडळकर यांनी रोहित पवारांना लगावला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER