भाजपने संधी दिलेले राष्ट्रवादीला रुचलेले नाही : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar- Sharad Pawar

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे . या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाजपचे दुसरे उमेदवार प्रवीण दटके यांच्या उमेदवारीवरदेखील आक्षेप घेण्यात आले आहेत. मात्र यामागे संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस सहभागी आहे, असा आरोप नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

बहुजन समाजातील तरुणाला भाजपने संधी दिली हेच मुळात राष्ट्रवादीतील प्रस्थापित नेतेमंडळींना रुचलेले नाही. ही मंडळी एवढ्यावरच थांबली नसून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्जाच्या प्रमाणित प्रती मागून न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामागे अजित पवार, जयंतराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतील जबाबदार नेतेमंडळीचे मोठे षडयंत्र आहे. ते उघड झाले आहे. यासंदर्भात मी लवकरच मुंबईतून परतल्यानंतर अधिक स्पष्टीकरण करणार आहे आणि प्रस्थापित नेतेमंडळींचा खरा चेहरा लोकांच्या समोर आणणार असल्याचे पडळकर म्हणाले.

बहुजन समाजाला भाजपने विधानपरिषदेला संधी दिली हेच प्रस्थापित नेतेमंडळींना झोंबले आहे. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवस पूर्ण ताकद लावून आणि पदाचा गैरवापर करून कागदपत्रे गोळा केली आणि माझ्या उमेदवारीला आक्षेप घेतला, असा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे निश्चित झाले होते; मात्र अर्जाच्या छाननी दिवशी शशिकांत शिंदे यांना पुढे करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पूर्ण ताकदीने पोलिसांकडून माहिती आणि कागदपत्रे गोळा केली. निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरलेले असतानाही केवळ बहुजन समाजाचा आवाज दाबण्यासाठी दोन दिवस त्यांनी षडयंत्र रचले. मी उमेदवारी अर्जात विटा पोलीस ठाण्यात माझ्यावर दाखल असलेले गुन्हे लपविले आहेत, असा आक्षेप घेतला. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. समाजकारण आणि राजकारण करताना माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत. यातील अनेक गुन्ह्यांतून न्यायालयाने निकाल देऊन निर्दोष मुक्तता केली आहे; पण जयंतरावांनी याची पूर्ण माहिती घेतली नाही. माझ्या उमेदवारीला आक्षेप घेतल्यानंतर देवेंद्र फडवणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ वकील पाठवून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण केले. त्यानंतर राष्ट्रवादीने माझ्यावरती घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला आणि माझा अर्ज मंजूर केला, असे पडळकर म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला