गोपीचंद आणि सदाभाऊ यांचे जयंत पाटील यांच्या राजीनाम्यासाठी अनोखे आंदोलन

Gopichand Padalkar-Sadabhau Khot-Jayant Patil

सांगली : सांगलीमध्ये कोरोनाने (Corona Virus) कहर माजवला आहेराज्यात सर्वाधिक मृत्यूदर जिल्ह्यात आहे. रुग्णांना खाटा मिळत नाहीत. पालकमंत्र्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. रुग्णालयांमधील सुविधांसाठी निधी आणण्यात पालकमंत्री अपयशी ठरले. जयंत पाटील यांनी सांगलीच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात खरडा भाकरी खात त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

सांगलीत ऑक्सिजन खाटांची कमतरता आहे. पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. या स्थितीत सांगतील ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्यातही ते अपयशी ठरले. सांगलीसाठी निधी आणू शकले नाहीत हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. करोना संसर्गानंतर ते जिल्ह्यातील परिस्थिती हाताळू शकले नाहीत. या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी तातडीने पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

दुसऱ्यांदा आढावा बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्यानेही त्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय? आढावा बैठकीसाठी लोकप्रतिनिधींना बोलवण्याचे त्यांच्यात धाडस नाही. हे असेच सुरू राहिल्यास त्यांना जिल्ह्यात फिरणे मुश्कील होईल,असा इशाराही पडळकर यांनी दिला.

आमदार सदाभाऊ खोत यांनी आरोग्य यंत्रणांच्या अपयशावर बोट ठेवले. ते म्हणाले, सांगली जिल्हा करोनाची स्मशानभूमी होत आहे. तपासणीचे अहवाल चार-पाच दिवस मिळत नाहीत. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी घरातच जीव गेला. अशा रुग्णांची नोंद आरोग्य यंत्रणांकडे नाही. नॉनकोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही. आरोग्य यंत्रणा पूर्ण कोलमडली असून, यावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचेही नियंत्रण नाही. प्रशासन लोकप्रतिनिधींशी संवाद साधत नाही. निवेदन देण्यासाठी लोकप्रतिनिधींनाही जिल्हधिकारी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास प्रवेशद्वार तोडून आम्ही जिल्हधिकारी कार्यालयात प्रवेश करू. यावेळी रयत क्रांती संघटना आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER