गुगल, फेसबुक नमले; मात्र ट्विटर भारताच्या लोकशाहीवर अटी लादण्याच्या प्रयत्नात, केंद्राचा आरोप

Twitter - Ravi Shankar Prasad

नवी दिल्ली : गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या बड्या डिजिटल कंपन्यांनी भारतातील नवीन सोशल मीडिया नियमांनुसार तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासह इतर माहिती सार्वजनिक करण्याच्या उद्देशाने आपली वेबसाइट अद्ययावत (अपडेट) करणे सुरू केले आहे. मात्र ट्विटर (Twitter) अद्यापही नव्या नियमांना लागू करण्यास तयार नाही. आपल्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या ट्विटरच्या निवेदनाला केंद्र सरकारने (Central Government) प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, घाबरवण्याबाबत किंवा धमकावण्याबाबत ट्विटरने केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत.

आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर ट्विटर आपल्या अटी लादण्याच्या प्रयत्नात आहे. ट्विटर जाणीवपूर्वक नियमांचे पालन करत नाही, ते मुद्दामच भारताची कायदा व सुव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सोशल मीडिया कंपन्यांचे भारतातील प्रतिनिधी सुरक्षित होते आणि पुढील काळातही ते सुरक्षित राहतील. ट्विटरचा भारतात मोठा युजर बेस आहे, परंतु ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे भारतात कोणतेही अधिकारी नाहीत. जेव्हा भारतातील लोक कोणत्याही प्रकारचा मुद्दा उपस्थित करतात, किंवा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा ट्विटरकडून असे सांगितले जाते की, भारतातील लोकांनी ट्विटरच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजिटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे (आयटी) विविध तपशील शेअर केले आहेत. तथापि, ट्विटर अद्याप नियमांचे पालन करीत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button