गुगल, फेसबुक आणि आत्मनिर्भरतेचा धडा…

Shailendra Paranjapeगुगलनं आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून ऑनलाइन बाजारपेठेवर वर्चस्व मिळवले असून सामान्य ग्राहक आणि जाहिरातदार यांच्या हक्कांवर गदा येतेय, असा आरोप अमेरिकेतल्या पन्नासपैकी ३८ राज्यांनी केलाय. त्या सर्व राज्यांनी अमेरिकेतल्या फेडरल कोर्टाकडेही त्याविरुद्ध दाद मागितली आहे. विशेष म्हणजे याआधी फेस बुकच्या विरोधातही पन्नासपैकी ४८ राज्यांनी न्यायालयाची दारं ठोठावली आहेत, अशा आसयाचं वृत्त प्रसारित झालंय.

ही बातमी अमेरिकेतली असली तरी त्याचा आपण सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. सोशल मिडियाचा दैनंदिन जीवनातला हस्तक्षेप आणि प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. भारतात मोबाईल फोन्सचं पेनिट्रेशन म्हणजे वापरही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या परिणामस्वरूप दैनंदिन जीवन सहज सोपं होणं, हे अपेक्षित आहे आणि क्रमप्राप्तही आहे. त्यामुळे विज्ञान नको, तंत्रज्ञान नको असं म्हणणं म्हणजे काळाची पावलं मागं खेचण्यासारखं आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही. पण तरीही विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. मुळात कुठलेच तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवणारे विज्ञान हे कधीच विघातक नसते तर त्याचा वापर माणूस कसा करतो, यावर त्याची विधायकता किंवा विघातकता ठरत असते. बहुतांश वेळा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापराच्या वेळी कालांतराने विवेकाला विसरून कृती केली गेल्याचं निदर्शनाला येतं. त्यातूनच मग विवेकाचा अंकुश नसल्याने वरदान वाटणारे विज्ञान अचानकपणे न विसरता येण्यासारखा शाप वाटू लागते. हिरोशिमा नागासकीवर टाकल्या गेलेल्या अणुबॉम्बच्या प्रचंड संहारानंतर ही गोष्ट संपूर्ण जगानं अनुभवलेली आहे. त्याच प्रकारचा अनुभव नवनव्या तंत्रज्ञानांद्वारे बाजारपेठेवर मिळवलेल्या वर्चस्वातूनही योऊ शकतो. तसंच काहीसं घडताना दिसत आहे.

मराठीत साधी सोपी व्यवहारात प्रत्ययाला येणारी म्हण आहे. अती तिथं माती. या म्हणीचा अर्थ स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही, इतकी ती स्वयंस्पष्ट आहे. विज्ञान-तंत्रज्ञान असो की अन्य कोणतेही क्षेत्रं, ही म्हण चपखलपणे लागू पडताना दिसते. आपल्या दैनंदिन जीवनाकडे पाहिलं तर लक्षात येतं की आपण आधी चंगळवादी भोगवादी जीवनपद्धती स्वीकारली आणि नंतर जिमला पैसे भरून सडपातळ होण्याचा, वाढलेली पोटं कमी करण्याचा प्रयत्न करू लागलोय. शारीरिक निकोपपणा असो की बौद्धिक दिवाळखोरी, या सर्वच विषयात ही म्हण तर लागू पडतेच पण जगभरातल्या घडामोडींनतर पुन्हा एकदा गड्या आपला गाव बरा, या धर्तीवर गड्या आपलं भारतीय जीवनपद्धतीचं तत्त्वज्ञानचं बरं, असं म्हणायची वेळ येताना दिसते आहे.

औद्योगिक क्रांती किंवा विज्ञानातली क्रांती पाश्चिमात्त्य राष्ट्रांमधे झाली आणि नंतर ती आपल्याकडे आलीय पण अतितंत्रज्ञानाने होऊ घातलेल्या मातीवरचे उपाय सुचवण्यात भारतीय प्रज्ञा, भारतीय मन आघाडीवर राहिले पाहिजे. अमेरिका असो की इस्रायल वा युरोप, भारताला आता तितक्या सहजपणे गृहीत धरले जात नाहीये. भारतात असलेल्या १३७ कोटी नागरिकरूपी ग्राहकवर्गाचा प्रभावी वापर करायला आपण शिकत आहोतच. पण त्याबरोबरच केवळ ग्राहक न राहता बहुतांश समस्यांवरचे उपाय देण्यातही भारत हाच पर्याय असू शकतो, हे चित्र आपण निर्माण करायला हवे.

अमेरिकेत गुगल आणि फेसबुक यांच्याविरोधात बहुतांश राज्यांनी न्यायालयांचे दरवाजे ठोठावले आहेत, या घटनेवरून धडा घेऊन भारतानं सर्च इंजिनच्या संदर्भातही आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करायला हवा. अमेरिकेत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांचे प्रमाण इतके मोठे आहे की सिलिकॉन व्हँली भारतीय चालवताहेत, असंही म्हटलं जातं. पण प्रज्ञावंतांची भारतात वानवा नाही आणि त्यांनी फेसबुक, गुगलइतकेच प्रभावी पर्याय तयार करायचं आव्हान स्वीकारायला हवं. तसं झालं तर आत्मनर्भरतेकडे सुरू झालेला प्रवास खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे जाऊ शकेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER