चांगल्या अधिकाऱ्यांना शिक्षा अन् वादग्रस्तांना चांगली संधी ??

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते गुणग्राहक असल्याने चांगल्या आयएएस अधिकाऱ्यांना चांगली संधी देतील आणि त्यांच्या पोस्टिंगबाबत कोणतेही राजकारण करणार नाहीत अशी अपेक्षा होती पण ती एकामागून एक होत असलेल्या बदल्यांकडे पाहिले की पार फोल ठरत असल्याचे दिसते. आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून जे अधिकारी मानले जात होते ते टॅलेंटेड होते. पण ते केवळ फडणवीसांच्या जवळचे म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देणे कितपत उचित ठरते? उदहारणच द्यायचे तर प्रवीण दराडे यांचे देता येईल. ते अत्यंत अपराईट आॅफीसर मानले जातात. आतापर्यंत विविध पदांवर काम करताना त्यांनी कामाचा ठसा उमटवलेला आहे. वंजारी समाजातून आलेला हा उमदा तरुण अधिकारी अत्यंत धडपड्या पण त्यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या समाजकल्याण आयुक्तालयात (पुणे) आयुक्त म्हणून पाठविण्यात आले. त्या ठिकाणी आधी जे आयुक्त होते ते मिलिंद शंभरकर हे दराडे यांच्यापेक्षा दहा वर्षे ज्युनिअर होते. तेथे दराडेंना पाठवून काय साधले?

प्राजक्ता लवंगारे या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून समोर आलेल्या दलित समाजातील अधिकारी आहेत. त्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त म्हणून अतिशय चांगले काम करीत होत्या. विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना फलदायी ठरल्या. लवंगारे आतापर्यंत ज्याज्या पदांवर होत्या त्या पदांवर त्यांना भरभक्कम कमाई करता आली असती पण त्यांनी निरिच्छ भावनेने काम केले. लवंगारे यांना नव्या सरकारमध्ये अधिक चांगली संधी मिळाली असती तर त्यांना न्याय मिळाला असता, पण त्यांना मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून पाठविण्यात आले. दराडे असोत की लवंगारे मराठी आणि त्यातही लहान जातींतील उमद्या अधिकाऱ्यांवर अन्याय होतोय अशी भावना बळावणे चांगले नाही. अलिकडे करण्यात आलेल्या काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या बघा बहुतेक ठिकाणी हिंदी भाषिक अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नजीकच्या म्हणून टॅलेंटेड अधिकाऱ्याचा बळी जाण्याचे आणखी एक ढळढळीत उदाहरण म्हणजे मनीषा म्हैसकर. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून त्यांनी अत्यंत चांगले काम केले. मनीषा म्हैसकर या एक ब्रँड आहेत. गतिमान सरकारचे सारथ्य करणारे देवेंद्र फडणवीस यांनी शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ज्या निवडक अधिकाऱ्यांची मदत घेतली त्यात मनीषा म्हैसकर होत्या. त्यांच्याविषयी इतका आकस नव्या सरकारने बाळगला की त्यांची बदली राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून केली. ‘लॅक आॅफ टॅलेंट’चा प्रश्न नोकरशाहीमध्येदेखील अनेकदा उपस्थित होतो पण काही अधिकारी असे असतात की ज्यांच्यामुळे लॅक आॅफ टॅलेंटचा आरोप नोकरशाहीवर होत नाही. मनीषा म्हैसकर या त्यांच्यापैकीच एक. त्यांची एका बिनकामाच्या पदावर बदली करणे म्हणजे टॅलेंट वेस्ट करण्याचा प्रकार आहे.

धक्कादायक माहिती अशी आहे की, आता विशिष्ट आयएएस लॉबीकडून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांचा बळी घेण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून हटवून त्या ठिकाणी आशीषकुमार सिंग यांना आणण्याचे घाटत आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी मात्र या बदल्यांच्या वादळातून कसे वाचले या विषयी वेगवेगळी चर्चा आहे. परदेशी यांचे वनप्रेम सर्वश्रृत आहे. तर ते म्हणे उद्धवजींबरोबर या आधी काहीवेळा जंगल सफारीवर गेलेले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये विशेष स्रेह आहे. असेही म्हटले जाते की परदेशी हे उद्धवजी मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच मातोश्रीवर गेले आणि बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन मला दर्शन घ्यायचे आहे असे सांगितले. लगेच त्या खोलीत गेले आणि बाहेर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होते. मला त्या खोलीत प्रत्यक्ष बाळासाहेब दिसले असे त्यांनी उद्धवजींना सांगितले. तेव्हा परदेशींचा कंठ भरून आलेला होता अशी सर्वदूर चर्चा आहे. खरेखोटे माहिती नाही.